Thursday, September 17, 2026

Ganpati Visarjan 2026 : श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळांचा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

Ganpati Visarjan 2026 : श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळांचा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी), दादर चौपाटी विसर्जन स्थळांची प्रत्यक्ष भेट देऊन केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राज्योत्सवाचा मान लाभलेल्या श्रीगणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विविध सेवा-सुविधांनी सुसज्ज तयारी केली आहे. विसर्जन स्थळी उभारण्यात आलेले निरीक्षण मनोरे, तराफे, निर्माल्य कलश, तसेच गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अंथरलेल्या स्टील प्लेट्स आदी सुविधा सुस्थितीत व सुसज्ज ठेवाव्यात. मूर्ती विसर्जन स्थळांवरील गर्दी व आवश्यकतेचा विचार करून पुरेशा संख्येने तराफे उपलब्ध ठेवावेत. पुरेशी व योग्य प्रकाशव्यवस्था सुनिश्चित करावी, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी निर्देश दिले.

गणेशभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. जल सुरक्षेसाठी आवश्यक संख्येने प्रशिक्षित जीवरक्षक तैनात करावेत. यासोबतच पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र फिरत्या शौचालयांची व्यवस्था उपलब्ध करून देत विसर्जन स्थळी येणाऱ्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असेही निर्देश भिडे यांनी दिले आहेत. विसर्जन स्थळी निर्माल्य कलशांची संख्या वाढवून नदी, समुद्र किंवा परिसरात निर्माल्य न टाकता केवळ निर्माल्य कलशातच जमा करावे, यासाठी प्रभावी जनजागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

श्रीगणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेशभक्त, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच मुंबईकर नागरिकांना श्रीगणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांनी बुधवारी १६ सप्टेंबर २०२६ रोजी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) आणि दादर चौपाटी येथील विसर्जन स्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, विविध उपाययोजना, नागरी सेवा-सुविधा तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या विविध व्यवस्थांचा सविस्तर आढावा घेतला.

गणेशमूर्ती विसर्जनाच्या कालावधीत महानगरपालिका यंत्रणेने सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. विसर्जन प्रक्रिया सुरळीत, शिस्तबद्ध आणि सुरक्षितपणे पार पडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय राखून आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त भिडे यांनी दिल्या.

विसर्जन स्थळी संकलित होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याच्या प्रक्रियेबाबत सर्व संबंधित विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचनाही भिडे यांनी केली. या पाहणी दौऱ्यात उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव, उपायुक्त (परिमंडळ २) तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे, जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा