मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवरील वाहनांची वाढती संख्या पाहता १९३२ मध्ये बंद करण्यात आलेले मुंबई पोलिसांचे विशेष 'घोडदळ' (Mounted Unit) तब्बल ९२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा थेट सुरक्षेसाठी मैदानात उतरले आहे. आतापर्यंत केवळ प्रजासत्ताक दिन किंवा महत्त्वाच्या सरकारी संचलनापुरते मर्यादित असलेले हे पथक यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि गर्दी नियंत्रणासाठी चौपाट्यांवर प्रत्यक्ष तैनात केले जाणार आहे.
समुद्रकिनाऱ्यांवर वाहनांऐवजी घोड्यांची गस्त
कोरोना आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे पडला होता खंड
२०२० मध्ये हे युनिट पुनरुज्जीवित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर आलेली कोरोनाची लाट आणि तांत्रिक अडचणींमुळे त्याचा पूर्ण क्षमतेने वापर करता आला नाही. या युनिटमध्ये काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नियमित नियमानुसार इतरत्र बदली व्हायची, ज्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांना पुन्हा नव्याने घोडेस्वारीचे प्रशिक्षण द्यावे लागायचे. या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनाने आता एक नवा मार्ग शोधला आहे.
७० नवीन पदांची निर्मिती आणि १.२७ कोटींचा निधी मंजूर
प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 'स्पोर्ट्सपर्सन हॉर्स-रायडर' या स्वतंत्र संवर्गात ७० नवीन पदांना मंजुरी दिली आहे. यामध्ये माजी सैनिक, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू आणि घोडेस्वारीचा आधीपासून अनुभव असलेल्यांचीच थेट भरती केली जाईल. त्यामुळे वारंवार नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज उरणार नाही. याशिवाय, नवीन घोडे खरेदी आणि प्रशिक्षकांच्या मानधनासाठी सरकारने १.२७ कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे.
न्यायालयीन लढ्याला राजकीय ठरवण्याचा डाव असल्याचा सतीश सालियन यांचा आरोप; सात दिवसांत माफीची मागणी मुंबई : दिवंगत दिशा सालियन (Disha Salian) यांच्या ...
अंधेरीत तबेला; दुर्गम भागातही होणार वापर
अंधेरी पूर्व (Andheri East) येथील मरोळ परिसरात २.९६ एकरच्या विस्तीर्ण जागेत या घोड्यांसाठी सुसज्ज तबेला उभारण्यात आला आहे. सुमारे ६ महिन्यांचे कडक प्रशिक्षण पूर्ण केलेले हे प्रशिक्षित घोडे केवळ चौपाट्यांवरच नव्हे, तर गाड्या पोहोचू शकत नाहीत अशा दुर्गम टेकड्या आणि जंगल परिसरातही गस्तीसाठी वापरले जातील.
असा आहे या घोडदळाचा इतिहास
१९३२ मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त सर पॅट्रिक केली यांनी रस्त्यावरील वाढत्या गाड्यांमुळे घोडदळ बंद केले होते. त्यानंतर २०२० मध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेल्या नव्या गणवेशासह हे पथक पुन्हा सुरू झाले. परंतु, आजारपणामुळे ५ घोड्यांचा मृत्यू झाला आणि देखभालीचा खर्च जास्त असल्याने २०२२ मध्ये ते पुन्हा बंद पडले होते. अखेर सर्व अडचणी दूर करून २०२४ मध्ये हे पथक नव्या दमाने मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाले आहे.