Thursday, September 17, 2026

Nashik Traffic Update : गणेशोत्सवात नाशिकमधील वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गांवर नो व्हेईकल झोन, पर्यायी रस्तेही जाहीर

Nashik Traffic Update : गणेशोत्सवात नाशिकमधील वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गांवर नो व्हेईकल झोन, पर्यायी रस्तेही जाहीर

Nashik Traffic Update : गणेशोत्सवाच्या काळात देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता नाशिक शहर पोलिसांनी वाहतुकीसंदर्भात मोठे बदल जाहीर केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागासह पंचवटीतील काही प्रमुख रस्ते नो व्हेईकल झोन करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त (मुख्यालय व वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी मोटार वाहन कायद्यानुसार विशेष अधिसूचना जारी केली आहे. गणेशभक्तांना देखावे पाहताना अडचण येऊ नये आणि विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात, यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल तसेच संबंधित परिसरातील स्थानिक रहिवाशांच्या वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

18 ते 24 सप्टेंबरदरम्यान मध्यवर्ती भागात वाहतूक बंद

शालिमार, मेनरोड, बी. डी. भालेकर मैदान आणि रविवार कारंजा परिसरातील प्रमुख मार्गांवर 18 ते 24 सप्टेंबरदरम्यान दररोज सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. पंचवटी परिसरात 21 ते 24 सप्टेंबरदरम्यान सायंकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत. दिंडोरी नाका ते पंचवटी कारंजा आणि मालेगाव स्टँड, तसेच मखमलाबाद नाका ते मालेगाव स्टँड या मार्गांवर वाहतूक बंद राहील. याशिवाय काळाराम मंदिर, सरदार चौक, मालवीय चौक, गजानन चौक, नाग चौक आणि शिवाजी चौक परिसरातही वाहतूक निर्बंध लागू असतील.

बंद असणारे प्रमुख मार्ग :

शालीमार परिसर: अण्णाभाऊ साठे (किटकॅट) पुतळा चौक ते शालीमार रस्ता.

सीबीएस ते भालेकर मैदान: सीबीएसकडून कान्हेरेवाडी मार्गे बी. डी. भालेकर मैदानाकडे जाणारा रस्ता.

​नेहरू गार्डन व खडकाळी: खडकाळी सिग्नल ते शालीमार/सीबीएस, नेहरू गार्डन ते गाडगे महाराज पुतळा आणि खडकाळी ते पिंपळ चौक.

​मेनराेड व दहीपूल: बादशाही कॉर्नर, मेहेर सिग्नलकडून सांगली बँक/दहीपूल जाणारा रस्ता, आणि प्रतीक लॉजकडून नेपाळी कॉर्नरकडे जाणारा रस्ता.

रविवार कारंजा व अशोकस्तंभ: अशोकस्तंभाकडून रविवार कारंजा ते मालेगाव स्टँड आणि रविवार कारंजाकडून शालीमारकडे जाणारा रस्ता.

नागरिकांनी कोणते पर्यायी मार्ग वापरावेत ?

पंचवटी, पेठ आणि दिंडोरीकडे जाण्यासाठी : सीबीएस – मेहेर सिग्नल – अशोकस्तंभ – रामवाडी ब्रिज किंवा दिंडोरी नाका मार्गे पुढे जाता येईल.

मुंबई नाक्याकडून पंचवटीकडे जाण्यासाठी : मुंबई नाका – गडकरी सिग्नल – मोडक सिग्नल – सीबीएस – अशोकस्तंभ मार्गाचा वापर करावा.

गंगापूर रोडकडे जाण्यासाठी : मालेगाव स्टँड – मखमलाबाद नाका – रामवाडी – जुना गंगापूर नाका मार्गे जाता येईल.

18 आणि 20 सप्टेंबरला बसेसच्या मार्गातही बदल

गणेश विसर्जनाच्या 5व्या दिवशी म्हणजे 18 सप्टेंबर आणि 7व्या दिवशी म्हणजे 20 सप्टेंबरला, दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत निमाणी बसस्थानक आणि सीबीएसकडून पंचवटी/रविवार कारंजाकडे जाणाऱ्या एसटी, सिटीलिंक बसेस आणि अवजड वाहनांना काही मार्गांवर प्रवेश बंद राहणार आहे.

निमाणी – पंचवटी कारंजा – मालेगाव स्टँड – रविवार कारंजा तसेच सीबीएस – अशोकस्तंभ – रविवार कारंजा – पंचवटी कारंजा हे मार्ग या वाहनांसाठी बंद राहतील.

बसेससाठी पर्यायी मार्ग

नाशिक रोड, अंबड आणि सातपूरकडे जाणाऱ्या बसेस : निमाणी – काट्या मारुती चौक – संतोष टी पॉईंट/विश्वकर्मा चौक – कन्नमवार पूल – द्वारका सर्कल मार्गे जातील.

पंचवटी आणि निमाणीकडे जाणाऱ्या बसेस : सीबीएस – अशोकस्तंभ – रामवाडी ब्रिज – मखमलाबाद नाका – पेठ नाका – दिंडोरी नाका मार्गे निमाणीकडे जातील.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >