Nashik : जिल्हा परिषद नाशिकच्या ‘मिशन स्कॉलरशिप’ अंतर्गत ‘ज्ञानयात्री’ हा अभिनव शैक्षणिक सहल उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि लोकशाही संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. इयत्ता सातवीच्या सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांची विशेष निवड परीक्षा घेऊन गुणवत्तेच्या आधारे १०५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा परिषदेत पत्रकार परिषदेत दिली.
१५ तालुक्यांतून १०५ विद्यार्थी निवडणार
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी ‘ज्ञानयात्री’ उपक्रमाची संकल्पना व निवड प्रक्रियेची माहिती दिली. निवड परीक्षा गट व जिल्हा स्तरावर घेण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यातून सात विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांतून एकूण १०५ विद्यार्थी निवडले जातील. १०० गुणांची ही परीक्षा १२० मिनिटांची असून, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मराठी व उर्दू या दोन्ही माध्यमांतून घेण्यात येणार आहे.
निवड झालेल्या १०५ विद्यार्थ्यांचे तीन गट करण्यात येणार आहेत. त्यापैकी १५ विद्यार्थ्यांना अमेरिकेतील NASA या अवकाश संशोधन संस्थेला भेट देण्याची संधी मिळणार असून, अवकाश विज्ञान, संशोधन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. ४५ विद्यार्थ्यांना भारतातील ISROला भेट देऊन भारतीय अवकाश संशोधन, उपग्रह तंत्रज्ञान व वैज्ञानिक प्रगतीची माहिती मिळणार आहे. तर ४५ विद्यार्थ्यांना नवी दिल्लीतील संसद भवनासह विविध शैक्षणिक व लोकशाही संस्थांना भेट देत भारतीय लोकशाही व संसदीय कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
Nashik Traffic Update : गणेशोत्सवाच्या काळात देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता नाशिक शहर पोलिसांनी वाहतुकीसंदर्भात मोठे बदल जाहीर केले ...
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा, प्रश्न विचारण्याची वृत्ती, निरीक्षणशक्ती आणि विश्लेषणात्मक क्षमता विकसित करणे हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. वर्गखोलीतील शिक्षणाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देत विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि लोकशाही संस्थांमधील संधी विद्यार्थ्यांना जवळून समजाव्यात, यासाठी उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्ता आणि प्रतिभेची कमतरता नाही. योग्य संधी, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यास विद्यार्थी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या क्षमतेचा ठसा उमटवू शकतात. ‘ज्ञानयात्री’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना अनुभव व संधीची जोड देण्याचा प्रयत्न आहे. पत्रकार परिषदेस सहायक जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आडे, शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
‘ज्ञानयात्री’ उपक्रमाची वैशिष्ट्ये
१५ हजार विद्यार्थी - इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची निवड परीक्षा
१०५ ‘ज्ञानयात्री’ - गुणवत्तेच्या आधारे अंतिम निवड
१५ विद्यार्थी - अमेरिकेतील नासा अवकाश संशोधन संस्थेला भेट
४५ विद्यार्थी - भारतीय अवकाश संशोधन संस्थेला भेट
४५ विद्यार्थी - नवी दिल्लीतील संसद भवन व विविध लोकशाही संस्थांना भेट
१०० गुणांची परीक्षा - परीक्षेचा कालावधी १२० मिनिटे
मराठी व उर्दू माध्यम — दोन्ही माध्यमांतून परीक्षा