Sangli ATM Theft : एटीएम फोडून पैसे चोरण्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो, मात्र सांगलीत चोरट्यांनी चक्क संपूर्ण एटीएम मशीनच पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीवाडीतील डॉ. पतंगराव कदम कॉलेजसमोरील (Dr. Patangrao Kadam College) एचडीएफसी बँकेच्या एटीएम केंद्रातून चोरट्यांनी मशीन लांबवले. विशेष म्हणजे, या मशीनमध्ये तब्बल 10 लाख 34 हजार 800 रुपयांची रोकड होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एनसीआर कार्पोरेशन इंडिया प्रा. लि.चे स्थानिक प्रतिनिधी विकास आमनगी यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात (Sangli City Police Station) तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.
सुरक्षारक्षक नसल्याचा घेतला फायदा
पोलिसांच्या माहितीनुसार, बेंगळुरू येथील एनसीआर कार्पोरेशन इंडिया प्रा. लि. कंपनीकडून विविध जिल्ह्यांमध्ये बँकांची एटीएम मशीन बसवली जातात. सांगली जिल्ह्यात कंपनीची सुमारे 40 एटीएम मशीन, तर सांगली शहरात 35 मशीन आहेत. मात्र, या एटीएम केंद्रांवर सुरक्षारक्षक नियुक्त नसल्याचे समोर आले आहे. याचाच फायदा चोरट्यांनी घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरटे सांगलीवाडीतील एटीएम केंद्राजवळ आले. परिसरात सुरक्षारक्षक नसल्याचे पाहून त्यांनी एटीएममध्ये प्रवेश केला. त्यानंतर मशीनला जोडलेल्या वायरी तोडून संपूर्ण एटीएम मशीनच घेऊन चोरटे पसार झाले.
Kolhapur Kalamba Jail Attack : ‘तू लई नियमानं वागतोस, शांत राहा, नाहीतर बाहेर गेल्यावर तुला सोडणार नाही,’ अशी धमकी देत मोक्का प्रकरणातील कैद्यांनी थेट तुरुंग ...
बुधवारी सकाळी एटीएम केंद्रात मशीन नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती बँक अधिकाऱ्यांना देण्यात आली. चोरीला गेलेल्या एटीएममध्ये 10 लाख 34 हजार 800 रुपये रोख, तर एटीएम मशीनची किंमत सुमारे दीड लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार, एकूण 11 लाख 84 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात (Sangli City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात यापूर्वीही ATM चोरीचे प्रकार
सांगली जिल्ह्यात यापूर्वीही एटीएम चोरीच्या घटना घडल्या आहेत. मिरज तालुक्यातील बेडग-आरग रस्त्यावरील खासगी बँकेचे एटीएम चोरट्यांनी जेसीबीच्या सहाय्याने उखडून नेले होते. त्या मशीनमध्ये सुमारे 27 लाख रुपये होते. तर बुधगाव येथे गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून सुमारे 17 लाख 40 हजार रुपयांची रोकड चोरण्यात आली होती. डफळापूर येथेही मोटारीला दोरी बांधून एटीएम मशीन ओढून नेण्याचा प्रयत्न झाला होता. आता सांगलीवाडीत चोरट्यांनी एटीएम फोडण्याऐवजी थेट मशीनच पळवल्याने पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे.





