Friday, September 18, 2026

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाची जोरदार एन्ट्री, 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान अनेक जिल्ह्यांना दिलासा मिळणार

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाची जोरदार एन्ट्री, 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान अनेक जिल्ह्यांना दिलासा मिळणार

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकही पावसाची प्रतीक्षा करत होते. आता मात्र बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली असून, येत्या काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार, 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्र आणि गोवा परिसरात पावसात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना दिलासा मिळू शकतो.

21 ते 28 सप्टेंबरदरम्यान बहुतांश भागात पाऊस

21 ते 28 सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या या पावसामुळे सध्या कोरड्या असलेल्या भागांना काहीसा दिलासा मिळू शकतो. येत्या 19 ते 22 सप्टेंबरदरम्यान सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. 21 सप्टेंबरला नाशिकमध्येही मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच अहिल्यानगर, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांतही मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. 22 सप्टेंबरला मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहू शकतो.

परभणीत तब्बल 40 दिवसांनंतर पाऊस

परभणी जिल्ह्यात जवळपास 40 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाच्या सरी सुरू झाल्या. पावसाअभावी खरीप पिकांवर संकट निर्माण झालं होतं. सोयाबीन, कापूस आणि तूर यांसह विविध पिकांना पाण्याची गरज होती. त्यामुळे झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत. मात्र पिकांना या पावसाचा किती फायदा होईल, हे पुढील काही तासांत पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असणार आहे.

धाराशिवमध्ये मध्यरात्री हलक्या सरी

धाराशिव जिल्ह्यातही दीड महिन्याहून अधिक काळ पावसाची प्रतीक्षा होती. अशातच मध्यरात्री जिल्ह्यातील काही भागांत हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. पाऊस तुटपुंजा असला तरी दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात चांगला पाऊस पडून शेतीला पुरेसं पाणी मिळावं, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

लातूरमध्ये दीड महिन्यानंतर पावसाची हजेरी

लातूर शहर आणि परिसरातही दीड महिन्याच्या खंडानंतर पावसाने हजेरी लावली. रात्री दीड वाजल्यानंतर ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र जोरदार वारे आणि पावसामुळे शहरातील काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे.

हिंगोलीत जोरदार पाऊस; खरीप पिकांना दिलासा

हिंगोली जिल्ह्यातही गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरीप पिकांची अवस्था चिंताजनक झाली होती. मात्र रात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कोमेजलेल्या खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. विशेषतः पावसाअभावी मोठा फटका बसलेल्या सोयाबीन पिकासाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरू शकतो. दरम्यान, आगामी काही दिवसांत राज्यातील पावसाची स्थिती कशी राहते आणि कोणत्या भागात पावसाचा जोर वाढतो, याकडे शेतकरी आणि नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >