Saturday, September 19, 2026

Jalgaon Cotton Rate : जळगावात कापसाला हंगामाच्या सुरुवातीलाच 8,500 रुपये भाव, दरवाढीची शक्यता

Jalgaon Cotton Rate : जळगावात कापसाला हंगामाच्या सुरुवातीलाच 8,500 रुपये भाव, दरवाढीची शक्यता

Jalgaon Cotton Rate : जळगाव जिल्ह्यात यंदाच्या कापूस खरेदी हंगामाला सुरुवात झाली असून, जिनिंग आणि बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक हळूहळू वाढू लागली आहे. लागवड क्षेत्रात यंदा काहीशी घट झाली असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला नसल्याने कापसाचे उत्पादन आणि गुणवत्ता चांगली राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जागतिक बाजारात कापसाची तूट ?

यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे उत्पादन सुमारे 11 कोटी 73 लाख गाठी, तर सूतगिरण्यांची मागणी सुमारे 12 कोटी 29 लाख गाठी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सुमारे 50 लाख गाठींची तूट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच जुन्या कापसाच्या साठ्यातही कमतरता असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. याचा फायदा भारतीय कापसाला होऊ शकतो. विशेषतः बांगलादेश, व्हिएतनामसह इतर देशांमध्ये भारतीय कापसाच्या निर्यातीसाठी संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

जळगावात सुरुवातीलाच 8,500 रुपयांपर्यंत भाव

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाला 8,500 रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. गेल्या वर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीच्या तुलनेत हा भाव सुमारे 2,500 रुपयांनी अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा कापसाची गुणवत्ता चांगली राहण्याची शक्यता असून, जागतिक बाजारातील मागणी कायम राहिल्यास कापसाच्या दरात आणखी वाढ होऊ शकते.

शेतकऱ्यांना दरवाढीची आशा

आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी, कापसाची उपलब्धता आणि यंदाची गुणवत्ता या बाबींचा दरांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे कापसाचे दर यंदा तुलनेने स्थिर राहण्याची आणि मागणी वाढल्यास दर आणखी सुधारण्याची शक्यता कापूस बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे यंदाच्या हंगामातील दरांकडे विशेष लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >