Chhatrapati Sambhajinagar Crime : सायबर ठगांनी फसवणुकीसाठी आता ओळखीच्या व्यक्तींच्या फोटोचाही गैरवापर सुरू केल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील गारखेडा परिसरातील एका मोठ्या इन्फ्रा कंपनीच्या संचालकांच्या मुलीचा फोटो व्हॉट्सॲप DP वर ठेवून सायबर ठगांनी कंपनीच्या अकाउंटंटशी संपर्क साधला. संचालकच मेसेज करत असल्याचा बनाव करून आरोपींनी कंपनीच्या बँक खात्यांची माहिती आणि शिल्लक रकमेचे स्क्रीनशॉट मागवले. यानंतर वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अकाउंटंटने या मेसेजवर विश्वास ठेवत व्यवहार केले आणि अवघ्या दीड तासात कंपनीच्या खात्यांमधून तब्बल 3 कोटी 70 लाख रुपये दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर झाले.
मुलीचा फोटो पाहून अकाउंटंटचा विश्वास बसला
तक्रारीनुसार, आरोपींनी कंपनीच्या संचालकांच्या मुलीचा फोटो व्हॉट्सॲपच्या DP वर लावला होता. त्यामुळे मेसेज करणारी व्यक्ती संचालकांच्या कुटुंबातीलच असल्याचा आभास निर्माण झाला. यानंतर आरोपींनी व्हॉट्सॲप चॅटद्वारे कंपनीच्या अकाउंटंटशी संपर्क साधला. संचालकच संवाद साधत असल्याचे भासवत त्यांनी कंपनीच्या विविध बँक खात्यांमध्ये किती रक्कम शिल्लक आहे, याची माहिती आणि स्क्रीनशॉट मागवले. वरिष्ठांकडूनच सूचना आल्याचे समजून अकाउंटंटने ही माहिती आरोपींसोबत शेअर केली. (Chhatrapati Sambhajinagar Crime)
Nashik Road Jail Gangwar : सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील मानल्या जाणाऱ्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील (Nashik Road Central Jail) कैद्यांमधील मारामारीचे सत्र पुन्हा समोर आले ...
दीड तासात 3.70 कोटींचा व्यवहार
बँक खात्यांची माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी अकाउंटंटला वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे पाठवण्याच्या सूचना दिल्या. या सूचनांवर विश्वास ठेवून अकाउंटंटने व्यवहार करण्यास सुरुवात केली. 14 ते 15 सप्टेंबरदरम्यान अवघ्या दीड तासाच्या कालावधीत कंपनीच्या विविध खात्यांमधून 3 कोटी 70 लाख रुपये दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. नंतर हा प्रकार संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर अकाउंटंटने पोलिसांकडे धाव घेतली.
जवाहरनगर पोलिसांकडून तपास
या प्रकरणी 42 वर्षीय अकाउंटंटच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात (Jawaharnagar Police Station) सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. पैसे ज्या दोन बँक खात्यांमध्ये पाठवण्यात आले, त्या खात्यांची माहिती, व्यवहारांची साखळी आणि संबंधित व्यक्तींचा तपशील तपासला जात आहे. व्हॉट्सॲपवर संचालकांच्या मुलीचा फोटो वापरून अकाउंटंटला जाळ्यात ओढणाऱ्या आरोपींची ओळख पटवण्याचे आणि त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.





