Sunday, September 20, 2026

Nagpur Crime News : मृत कर्जदार, बनावट सही अन् खोटी कागदपत्रं! बँकेला ५.६५ कोटींचा गंडा, पाच जणांवर गुन्हा दाखल

Nagpur Crime News : मृत कर्जदार, बनावट सही अन् खोटी कागदपत्रं! बँकेला ५.६५ कोटींचा गंडा, पाच जणांवर गुन्हा दाखल

नागपूर : मृत व्यक्तीच्या नावाचा गैरवापर करून बनावट स्वाक्षऱ्या आणि कागदपत्रांच्या आधारे बँकेकडून तब्बल ५ कोटी ६५ लाख रुपयांचं कर्ज मंजूर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी पाच जणांविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि संगनमत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Nagpur Crime News)

दोन व्यवसायांच्या नावाने घेतलं कर्ज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताबर्डी परिसरातील भास्कर कॉम्प्लेक्समध्ये स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँकेची शाखा आहे. याच शाखेत काम करणाऱ्या नितीन कडू याच्यासह इतर आरोपींनी संगनमत करून कर्जासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे.

३० एप्रिल २०२२ रोजी ‘इंडिया पेट्रोकेमिकल’ या नावाने १ कोटी ६५ लाख रुपयांचा, तर ‘नरेंद्र ऑईल एजन्सी’ या नावाने ४ कोटी रुपयांचा कर्ज प्रस्ताव सादर करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ५ कोटी ६५ लाख रुपयांचं कर्ज घेण्यात आलं. (Nagpur Crime News)

ज्याच्या नावावर कर्ज, त्याचा आधीच मृत्यू

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कर्जासाठी ज्या नरेंद्र पुणेकर यांच्या नावाचा वापर करण्यात आला, त्यांचा २०२१ मध्येच मृत्यू झाला होता. त्यांच्या नावाने बनावट स्वाक्षरी आणि कागदपत्रे तयार करून कर्जाचा प्रस्ताव पुढे नेण्यात आल्याचं बँकेच्या तपासात समोर आलं.

१३ मे २०२२ रोजी हे कर्ज मंजूर झाल्यानंतर त्याची परतफेड मात्र व्यवस्थित झाली नाही. कर्जाचे हप्ते थकू लागल्यानंतर बँकेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. (Nagpur Crime News)

बँकेच्या तपासात बनावट कागदपत्रांचा पर्दाफाश

चौकशीदरम्यान नरेंद्र पुणेकर यांचा मृत्यू २०२१ मध्येच झाल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर कर्जासाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी संबंधित कागदपत्रांमध्येही बनावटपणा आढळून आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँकेचे मॅनेजर (लीगल) मोहन माधव क्षीरसागर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. (Nagpur Crime News)

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

या तक्रारीच्या आधारे सीताबर्डी पोलिसांनी देवेंद्र पुणेकर, नितीन पुणेकर, महेंद्र पुणेकर, धर्मेंद्र पुणेकर आणि नितीन कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बँकेची फसवणूक नेमकी कशा पद्धतीने करण्यात आली, बनावट कागदपत्रे कोणी तयार केली आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सीताबर्डी पोलीस करत आहेत. (Nagpur Crime News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >