मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईत विविध ठिकाणी दुर्घटनांच्या घटना समोर येत आहेत. आता दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात गणेश मंडपाजवळ विजेचा धक्का लागून एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत आणखी 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ( Mumbai Ganeshotsav 2026)
शनिवारी रात्री उशिरा काळाचौकीचा महागणपती मंडळाच्या परिसरात ही घटना घडली. गणेश दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक परिसरात उपस्थित होते. त्यावेळी अचानक काही भाविकांना विजेचा धक्का बसला. यामध्ये 2 मुले आणि 3 मुलींचा समावेश आहे. जखमींचे वय 8 ते 20 वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. ( electric shock)
पुणे : पुण्यातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल ( Ketan Agarwal) याच्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास पूर्ण ...
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. जखमींना उपचारासाठी मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी परळ येथील ग्लोबल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.
मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी 3 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. हे सर्वजण काळाचौकी परिसरात राहणारे असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या मुलांना नेमका विजेचा धक्का कशामुळे लागला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मंडप परिसरातील विद्युत जोडणी आणि इतर सुरक्षेच्या उपाययोजनांचीही तपासणी केली जात आहे. या दुर्घटनेमुळे गणेशोत्सवाच्या काळात लालबाग-परळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ( Ganesh pandal)






