Monday, September 21, 2026

India New Zealand FTA : भारताला दसऱ्याची मोठी भेट! भारत-न्यूझीलंड 'मुक्त व्यापार करार' २० ऑक्टोबरपासून लागू!

India New Zealand FTA : भारताला दसऱ्याची मोठी भेट! भारत-न्यूझीलंड 'मुक्त व्यापार करार' २० ऑक्टोबरपासून लागू!

'ड्युटी फ्री' प्रवेशामुळे नक्की काय फायदा होणार ?

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांमधील व्यापारी आणि आर्थिक संबंधांना नवी गती देणारा 'मुक्त व्यापार करार' (Free Trade Agreement - FTA) येत्या २० ऑक्टोबर २०२६ रोजी, म्हणजेच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रत्यक्ष लागू होणार आहे. या कराराची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, भारतातून न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या सर्व प्रकारच्या (१०० टक्के) वस्तूंना तिथे आता कोणत्याही कराशिवाय म्हणजेच पूर्णपणे 'शुल्कमुक्त' (Duty-Free) प्रवेश मिळणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी नवी दिल्लीत सोमवारी ही महत्त्वाची घोषणा केली.

पीयूष गोयल अन् टॉड मॅकक्ले यांच्यात व्हर्च्युअल संवाद

नवी दिल्लीत आयोजित एका विशेष कार्यक्रमादरम्यान पीयूष गोयल यांनी न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅकक्ले (Todd McClay) यांच्याशी ऑनलाईन (व्हर्च्युअल) संवाद साधून या कराराची अंमलबजावणीची तारीख निश्चित केली. दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा असल्याचे सांगत गोयल यांनी हा करार यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींचे कौतुक केले.

द्विपक्षीय व्यापार ३५,००० कोटींवर नेण्याचे लक्ष्य

या महत्त्वाकांक्षी करारामागे दोन्ही देशांच्या प्रमुखांचे राजनैतिक प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. जुलै २०२६ मध्ये न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचा भारत दौरा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा न्यूझीलंड दौरा यांमुळे या चर्चेला मोठी गती मिळाली. विशेष म्हणजे, गेल्या ४० वर्षांनंतर (चार दशकांत) पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांनी न्यूझीलंडचा दौरा केला होता. या कराराच्या माध्यमातून येत्या चार ते पाच वर्षांत दोन्ही देशांमधील वस्तू आणि सेवांचा द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून तो सुमारे ३५,००० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे मोठे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सॉन यांच्याकडून स्वागत

जवळपास नऊ महिने चाललेल्या वाटाघाटींनंतर २७ एप्रिल २०२६ रोजी नवी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सॉन (Christopher Luxon) यांनीही या कराराचे स्वागत केले आहे. या करारामुळे दोन्ही देशांतील व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, नवीन रोजगार निर्माण होतील आणि दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

व्यापार आणि निर्यातीत मोठी वाढ

सरकारी आकडेवारीनुसार, भारत आणि न्यूझीलंडमधील व्यापारी भागीदारी वेगाने वाढत आहे. २०२३-२४ मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार ८७३ दशलक्ष डॉलर्स होता, तो २०२४-२५ मध्ये तब्बल ४९ टक्क्यांनी वाढून १.३ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. यामध्ये भारताची न्यूझीलंडला होणारी निर्यात ७११ दशलक्ष डॉलर्स झाली असून त्यात ३२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान (IT), पर्यटन आणि व्यवसाय सेवा क्षेत्रातील भारताची सेवा निर्यातही १३ टक्क्यांनी वाढली आहे. २० ऑक्टोबरपासून हा करार प्रत्यक्ष लागू झाल्यानंतर भारतीय व्यापारी आणि निर्यातदारांसाठी न्यूझीलंडची बाजारपेठ आणखी सोपी आणि फायदेशीर ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >