मुंबई : पंचतारांकित हॉटेलमधील रेस्टॉरंटमध्ये जेवण करत असताना टेबलवर झुरळ आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि फोर्टिस हेल्थकेअरचे अध्यक्ष डॉ. अशोक सेठ यांनी या घटनेचा अनुभव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. मुंबईतील सहार परिसरातील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमधील रोमानो रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. (JW Marriott Mumbai)
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
डॉ. सेठ शनिवारी रात्री काही परदेशी प्रतिनिधींसोबत जेवण्यासाठी या रेस्टॉरंटमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्या टेबलवर ठेवलेल्या भांड्यांच्या आसपास एक झुरळ फिरताना दिसले. त्यांनी या घटनेचा फोटो किंवा अनुभव शेअर करत उपहासात्मक पद्धतीने पोस्ट केली. झुरळाला त्यांनी ‘रोची’ असे नाव देत, ते जेवायला अनपेक्षितपणे आले असल्याचे म्हटले.
झुरळ बराच वेळ टेबलजवळ फिरत राहिल्याने आपली भूकच गेली आणि जेवण पूर्ण न करताच तेथून निघून गेल्याचे डॉ. सेठ यांनी सांगितले. या घटनेनंतर त्यांनी हॉटेलमधील स्वच्छतेच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.
मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक मुंबईत येतात. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ओळख ...
त्यानंतर एनडीटीव्हीशी बोलताना डॉ. सेठ यांनी ही बाब गंभीर असल्याचे म्हटले. टेबलवर झुरळ आढळल्याने स्वयंपाकघराच्या स्वच्छतेबाबतही चिंता निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. पंचतारांकित हॉटेलमध्ये ग्राहकांकडून मोठे शुल्क घेतले जाते, त्यामुळे स्वच्छता आणि अन्नसुरक्षेची योग्य काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या पोस्टमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे, FSSAI आणि जेडब्ल्यू मॅरियटला टॅग केले आहे. तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यात अन्नसुरक्षेबाबत तपासण्या आणि कारवाई सुरू असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
दरम्यान, या घटनेबाबत जेडब्ल्यू मॅरियटकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.