Monday, September 21, 2026

Crime News : जादूटोण्याच्या नावाखाली महिलांचे व्हिडिओ बनवून डार्क वेबवर विकले अन्..., भोंदूबाबा ताब्यात

Crime News : जादूटोण्याच्या नावाखाली महिलांचे व्हिडिओ बनवून डार्क वेबवर विकले अन्..., भोंदूबाबा ताब्यात

Tamil Nadu Crime News : तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलांचं आणि अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका कथित तांत्रिकाला अटक केली आहे. विजयराजा (वय 50) असं आरोपीचं नाव असून, तो वाझपडीजवळ जादूटोण्याचं केंद्र चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विधी आणि जादूटोण्याच्या नावाखाली तो लपवलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून महिला आणि मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. त्यानंतर हे व्हिडिओ ऑनलाइन विकले जात असल्याचा आरोप आहे.

लॅपटॉपमध्ये 50 हून अधिक व्हिडिओ

पोलिसांनी आरोपीकडून लॅपटॉप जप्त केला असून, त्यामध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 हून अधिक व्हिडिओ आढळल्याची माहिती दिली आहे. काही महिलांना गुंगीचं औषध मिसळलेलं पाणी किंवा प्रसाद दिला जात असल्याचाही पोलिसांचा आरोप आहे. महिला बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले जात असल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

शाळकरी मुलीच्या तक्रारीनंतर प्रकार उघडकीस

विनायक चतुर्थीसाठी देणगी गोळा करण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलीचा विनयभंग करण्याचा आरोपीने प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबीय आणि काही स्थानिक तरुण आरोपीच्या ‘शनेश्वर’ नावाच्या केंद्रावर पोहोचले. मात्र, गर्दी झाल्याचं लक्षात येताच आरोपीने परिसर बंद करून तेथून पळ काढला. तो जवळच लपून बसल्याची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला पकडून वाझपडी पोलिसांच्या ताब्यात दिलं.

कारखाना बंद झाल्यानंतर बनला ‘बाबा’

पोलिसांच्या चौकशीत आरोपी पूर्वी एका भांड्यांच्या कारखान्यात काम करत असल्याची माहिती समोर आली. कारखाना बंद झाल्यानंतर त्याने स्वतःला बाबा आणि गूढविद्येचा जाणकार म्हणून सादर करण्यास सुरुवात केल्याचं पोलिसांनी सांगितलं. चौकशीदरम्यान आरोपीने एका वेबसाइटकडून अशा व्हिडिओंसाठी पैसे मिळत असल्याचं सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो महिलांचे व्हिडिओ तयार करून संबंधित वेबसाइटवर पाठवत असल्याचा आरोप आहे.

डिजिटल उपकरणे जप्त; आणखी कोणाचा सहभाग ?

या प्रकरणी पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणं जप्त केली आहेत. या प्रकरणात आरोपी एकटाच सहभागी होता की त्यामागे आणखी काही व्यक्ती किंवा ऑनलाइन नेटवर्क कार्यरत होतं, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. जप्त करण्यात आलेल्या डिजिटल उपकरणांमधून आणखी काही महत्त्वाचे पुरावे किंवा पीडितांची माहिती समोर येते का, याकडे पोलिसांचं लक्ष आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >