Monday, September 21, 2026

Saurav Gurjar : लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप; ‘महाभारत’ फेम सौरव गुर्जरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Saurav Gurjar : लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप; ‘महाभारत’ फेम सौरव गुर्जरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Saurav Gurjar News : ‘महाभारत’ मालिकेत भीमची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला आणि रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा’मध्ये झळकलेला अभिनेता सौरव गुर्जर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका 29 वर्षीय महिलेने लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप सौरव गुर्जरवर केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलं. त्यानंतर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आल्यानंतर सौरवला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

29 वर्षीय महिलेची तक्रार

एएनआयच्या वृत्तानुसार, एका 29 वर्षीय महिलेने सौरव गुर्जरविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या आरोपानुसार, सौरवने तिच्याशी जवळीक वाढवत लग्नाचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर तिचं लैंगिक शोषण केलं. महिलेच्या तक्रारीवरून गचीबोवली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी सौरवला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतल्यानंतर त्याला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Instagram वरून झाली होती ओळख

महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, 2021 मध्ये तिची आणि सौरव गुर्जरची ओळख Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना फोन नंबर दिले आणि WhatsApp वरून संवाद सुरू झाला. पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमसंबंधात झाल्याचा महिलेचा दावा आहे. तक्रारीनुसार, 25 डिसेंबर 2021 रोजी दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. या भेटीनंतर सौरवने लग्नाचं आश्वासन देऊन तिचा विश्वास संपादन केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पुढे याच आश्वासनाच्या आधारे तिचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा दावा तिने तक्रारीत केला आहे. या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, तक्रारीतील दावे तपासातून कितपत सिद्ध होतात, हे पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

‘महाभारत’पासून ‘ब्रह्मास्त्र’पर्यंत काम

सौरव गुर्जर हा अभिनेता असण्यासोबतच माजी WWE कुस्तीपटूही आहे. त्याने अनेक लोकप्रिय मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘महाभारत’ मालिकेत त्याने भीमाची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘शिव शक्ती – त्याग तांडव’, ‘वीर आंजनेय’ आणि ‘संकटमोचन महाबली हनुमान’ यांसारख्या पौराणिक मालिकांमध्येही तो दिसला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा’ या सिनेमातही त्याने भूमिका साकारली होती. दरम्यान, सौरव गुर्जरविरोधात करण्यात आलेल्या आरोपांमुळे त्याच्या चाहत्यांमध्येही चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गचीबोवली पोलिसांकडून केला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >