Monday, September 21, 2026

Sindhudurg News: सिंधुदुर्गात ऑनलाइन गेमिंग, मटक्याविरोधात विशेष यंत्रणा, मंत्री नितेश राणे यांची माहिती

Sindhudurg News: सिंधुदुर्गात ऑनलाइन गेमिंग, मटक्याविरोधात विशेष यंत्रणा, मंत्री नितेश राणे यांची माहिती
मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑनलाइन गेमिंग, ऑनलाइन मटका आणि जुगाराच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याबाबत गृह विभागाकडून अधिक मनुष्यबळ आणि स्वतंत्र पथक उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी दिली. जिल्ह्यातील तरुणांना ऑनलाइन गेमिंगच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी सायबर सुरक्षेवरील नियंत्रण अधिक मजबूत करण्याबाबत जिल्हा प्रशासन आणि पोलिसांसोबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
ओरोस येथे माध्यमांशी संवाद साधताना राणे म्हणाले की, सिंधुदुर्गातील ऑनलाइन गेमिंग आणि सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर विशेष आढावा घेण्यात आला. पोलिसांच्या कारवाईमुळे मटका आणि जुगाराची अनेक केंद्रे बंद झाली असली तरी ऑनलाइन माध्यमातून सुरू असलेल्या प्रकारांवरही आता लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा गोव्याच्या सीमेला लागून असल्याने ऑनलाइन मटका आणि गेमिंगसारख्या प्रकारांचा धोका अधिक असल्याचे राणे यांनी नमूद केले. तरुण-तरुणींना अशा चुकीच्या सवयींच्या सापळ्यात अडकण्यापासून रोखण्यासाठी जिल्ह्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कशी उभारता येईल, तसेच राज्याच्या गृह विभागाकडून जिल्ह्याला अधिक बळ कसे मिळवून देता येईल, याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
ऑनलाइन माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्यांचे ‘डिटेक्शन’ कसे वाढविता येईल आणि हे गुन्हे का व कशा पद्धतीने घडत आहेत, याबाबत पोलीस अधीक्षकांनी बैठकीत माहिती दिली. त्यानुसार पुढील काळात आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. या कामासाठी अतिरिक्त मनुष्यबळ किंवा स्वतंत्र पथकाची आवश्यकता असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सिंधुदुर्गला विशेष प्रकरण म्हणून अतिरिक्त पथक उपलब्ध करून देण्याबाबतही विचार करण्यात येत असल्याचे राणे यांनी सांगितले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >