नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Pareeniti Chopra) 'शक: ट्रस्ट नो वन' (Shaque: Trust No One) या सायकोलॉजिकल थ्रिलर सिरीजद्वारे डिजिटल विश्वात (OTT) पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येण्यापूर्वीच तिचा पती आणि खासदार राघव चड्ढा यांनी एक अतिशय मनस्पर्शी संदेश शेअर करत परिणीतीचे कौतुक केले आहे. अत्यंत कठीण भूमिकेसाठी तिने घेतलेले कष्ट आणि समर्पण पाहून पती म्हणून आपल्याला तिचा अतोनात अभिमान वाटत असल्याचे राघव यांनी आवर्जून सांगितले.
शिमल्यातील शूटिंगच्या आठवणी अन् टीमचे कौतुक
View this post on Instagram
सोशल मीडियावर या सीरिजचा ट्रेलर शेअर करत राघव चड्ढा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "आपल्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या व नाजूक टप्प्यावर तू या प्रोजेक्टसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. तुझी तयारी मी जवळून पाहिली आहे," असे त्यांनी लिहिले. शिमल्यात झालेल्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी सेटवरील सकारात्मक वातावरणाचा आणि कलाकारांच्या गुणवत्तेचा विशेष उल्लेख केला. २४ सप्टेंबरला रिलीज होणारी ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. या पोस्टवर परिणीतीने राघव यांचे आभार मानत त्यांना 'बेस्ट हजबंड' म्हटले, तर प्रियंका चोप्रानेही पोस्ट शेअर करून परिणीतीचे अभिनंदन केले.
'शक' सीरिजची कथा आणि कलाकारांची फौज
'शक' ही सिरीज एका अशा दुःखी आईच्या भोवती फिरते, जिचे लहान मूल अचानक हरवते आणि पुढील ९ वर्षे ती त्याच्या शोधासाठी लढा देते. या प्रवासात जशी ती सत्यापर्यंत पोहोचते, तसे नातेसंबंध आणि विश्वासावर प्रश्न उपस्थित करणारे अनेक धक्कादायक खुलासे समोर येतात. रेन्सिल डिसिल्व्हा आणि सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांची निर्मिती असलेल्या या थ्रिलर सीरिजमध्ये परिणीतीसोबत जेनिफर विंगेट, ताहीर राज भसीन, सोनी राझदान, अनुप सोनी आणि सुमीत व्यास यांसारखे तगडे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.






