Jui Gadkari : अभिनेत्री जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेमुळे चर्चेत आहे. मात्र, याचदरम्यान तिच्याबाबत सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका कथित बनावट व्हिडीओमुळे जुई संतापली आहे. एका युट्यूब चॅनेलने तिचे फोटो मॉर्फ करून वैयक्तिक आयुष्याबाबत चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप तिने केला आहे.
फोटो मॉर्फ करून साखरपुड्याचा दावा
जुईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर संबंधित व्हिडीओचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, व्हिडीओमध्ये तिचे फोटो एडिट किंवा मॉर्फ करण्यात आले असून, त्यासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खोटी माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मराठी मनोरंजनविश्वातील एका स्टार कपलच्या मुलासोबत जुईचे फोटो मॉर्फ करून तिचा साखरपुडा झाल्याचा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आल्याचे तिने म्हटले आहे.
‘लाईक्स आणि व्ह्यूजसाठी हे सगळं कशासाठी?’
या प्रकारावर जुईने सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अशा प्रकारचा कंटेंट तयार करण्याची गरज काय, असा सवाल तिने संबंधित युट्यूब चॅनेलला केला. व्हिडीओमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेबद्दलही जुईने आक्षेप घेतला असून, अशा प्रकारच्या कंटेंटमुळे कलाकारांच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका तिने मांडली.
‘व्हिडीओ डिलीट करा, नाहीतर...'
जुईनं इन्स्टाग्राम स्टोरीवर संताप व्यक्त केलाय. तू जो कोणी आहेस. कृपया एखादी नोकरी कर. असले फालतू व्हिडीओ लाईक आणि व्ह्यूजसाठी बनवायला लाज पण वाटत नाही का?, असा संतप्त सवाल जुई गडकरीनं विचारलाय. तुम्हाला धड AI पण करता येत नाहीय... अशुद्ध भाषा, सगळंच अशुद्ध. हा व्हिडीओ आजच्या आज डिलिट नाही झाला, तर लवकरच कोर्टात भेटूयात..., असा थेट इशाराही जुई गडकरी हिनं दिलाय. जुईने याप्रकरणी कठोर भूमिका घेत संबंधितांना थेट इशारा दिला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडीओ तातडीने हटवला नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. “आजच्या आज डिलीट नाही झाला, तर लवकरच कोर्टात भेटूया,” अशा शब्दांत जुईने संबंधितांना सुनावलं आहे.
बनावट कंटेंटचा मुद्दा पुन्हा चर्चेत
कलाकारांच्या फोटो आणि व्हिडीओमध्ये फेरफार करून त्यांचा वेगळ्या संदर्भात वापर करण्याचे प्रकार सोशल मीडियावर यापूर्वीही समोर आले आहेत. एडिटिंग आणि एआय तंत्रज्ञानामुळे अशा प्रकारचा बनावट कंटेंट तयार करणे सोपे झाले आहे. त्यामुळे कलाकारांच्या प्रतिमा आणि वैयक्तिक आयुष्याबाबत चुकीची माहिती पसरण्याचा धोका वाढला आहे. जुई गडकरीच्या या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील अशा बनावट कंटेंटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान, जुई सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत असून, तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.