CSMT घटनेची आता थेट CID कडून चौकशी!
मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे RPFच्या ताब्यात असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे RPF विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील खांडवा येथील 35 वर्षीय इम्रान शेख असे मृत तरुणाचे नाव आहे. रोजगाराच्या शोधात तो दोन दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. त्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी RPF जवानांवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने हे आरोप फेटाळत इम्रानने सुरुवातीला RPF जवानांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.
दिल्ली : दिल्लीतील कालकाजी मंदिर परिसरातून अल्पवयीन मुलीवर अत्यावर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 17 वर्षीय मुलीला आणि तिच्यासोबत असलेल्या ...
नेमकं इमरान सोबत काय घडलं ?
इमरान 20 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 10:18 वाजता CSMT येथील RPF मुख्य चौकीत गेला होता. त्याला खांडव्याला जाणाऱ्या गाड्यांबाबत माहिती हवी होती. त्यावेळी तो अस्वस्थ आणि आक्रमक अवस्थेत असल्याचे RPFकडून सांगण्यात आले. काही जण आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा तो दावा करत होता. त्यानंतर त्याने RPFचे SI अनिकेत यांच्यावर हल्ला केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
इम्रानला स्वतःला इजा होऊ नये म्हणून RPF जवानांनी ताब्यात घेतले आणि GRPला माहिती दिली. त्यानंतर GRPचे पाच कर्मचारी चौकीत पोहोचले. काही वेळाने इम्रानला शौचालयात जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, बराच वेळ तो बाहेर न आल्याने जवानांनी दरवाजा उघडला. त्यावेळी तो आत बेशुद्ध अवस्थेत आढळला.
इम्रानला तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दुपारी सुमारे 12:54 वाजता त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर GRPने अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी JJ रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
प्रकरण थेट CID कडे
दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र CIDकडे सोपवण्यात आला आहे. CIDने CSMT स्थानक आणि RPF कार्यालयातील CCTV फुटेज ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. इम्रानच्या हालचालींचाही मागोवा घेतला जात आहे. त्याच्याकडे ओळखपत्र किंवा मोबाईल सापडला नसून, दोन रेल्वे तिकिटे मिळाली आहेत.
इम्रानच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. त्याच्या मृत्यूमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.