Wednesday, September 23, 2026

Qeshm explosion : दशकांची कटुता संपणार का ? अमेरिका-इराण ऐतिहासिक चर्चेत आले मोठे वळण, पण केशम बेटाजवळ का झाला स्फोट?

Qeshm explosion : दशकांची कटुता संपणार का ? अमेरिका-इराण ऐतिहासिक चर्चेत आले मोठे वळण, पण केशम बेटाजवळ का झाला स्फोट?

तेहरान: दीर्घकाळापासून एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जाणाऱ्या अमेरिका आणि इराणच्या संबंधांवरून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनादरम्यान इराणच्या प्रतिनिधीमंडळाने वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांशी पहिल्यांदाच थेट चर्चा केली आहे. मात्र, दुसरीकडे एका बाजूला ही शांतता चर्चा सुरू असतानाच, होर्मुझ सामुद्रधुनीतील केशम बेटाजवळ स्फोटाचा जोरदार आवाज ऐकू आल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला आहे.(Qeshm explosion)

तीन तास चालली महत्त्वाची बैठक

इराणचे प्रतिनिधीमंडळ संयुक्त राष्ट्र महासभेच्या वार्षिक बैठकीसाठी न्यूयॉर्कमध्ये पोहोचले असताना ही अनपेक्षित बैठक पार पडली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या भाषणानंतर माहिती दिली की, त्यांचे प्रमुख दूत स्टीव्ह विटकॉफ (Steve Witkoff) आणि जॅरेड कुशनर (Jared Kushner) यांनी जगभरातील नेत्यांच्या या वार्षिक बैठकीदरम्यान इराणी अधिकाऱ्यांसोबत तब्बल तीन तास चर्चा केली.

"ही बैठक अत्यंत सकारात्मक पार पडली असून लवकरच आणखी चर्चा केली जाईल," असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. जरी इराणचे अधिकारी सर्वोच्च पातळीवरील नव्हते, तरीही ही एक महत्त्वाची सुरुवात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, विटकॉफ यांनी ‘एक्स’ (X) वरील पोस्टमध्ये स्पष्ट केले की, ही चर्चा मध्यस्थांच्या माध्यमातून पार पडली, जे दोन्ही पथकांमध्ये ये-जा करत होते. ही प्रक्रिया अतिशय रचनात्मक आणि आशादायी ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी वर्तवली.(Qeshm explosion)

केशम बेटाजवळ स्फोटाचे सत्र

एकतर्फ़ इराण अमेरिकेसोबत शांतता चर्चेची पावले उचलत असताना, दुसरीकडे देशांतर्गत तणाव कायम आहे. इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, होर्मुझ सामुद्रधुनीजवळील केशम बेटावर स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला. सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामागचे नेमके कारण आणि त्यापासून झालेली हानी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विशेष म्हणजे, फेब्रुवारीमध्ये इराणविरोधात अमेरिका-इस्त्रायल युद्ध सुरू झाल्यापासून या बेटावर अनेकदा असे स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत.(Qeshm explosion)

युद्धाची टांगती तलवार आणि आर्थिक संकट

काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे धमकी दिली होती की, सात महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी लवकरात लवकर कोणताही करार झाला नाही, तर अमेरिका या इस्लामिक देशाला पूर्णपणे उद्ध्वस्त करेल. या प्रदीर्घ युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर मोठा परिणाम झाला असून, इराणच्या अर्थव्यवस्थेलाही प्रचंड फटका बसला आहे. परिणामी, इराणमध्ये गंभीर चलनाचे संकट निर्माण झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत अमेरिका-इराण मधील ही थेट चर्चा भविष्यातील युद्धाचे चित्र बदलणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.(US Iran war)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >