Wednesday, September 23, 2026

Pakistan Politics : "भस्मासूर" स्वतःच्याच विनाशाचे कारण ठरणार? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचीच खळबळजनक कबुली..

Pakistan Politics :

इस्लामाबाद: पाकिस्तानने गेल्या अनेक दशकांत ज्या दहशतवादी संघटनांना खतपाणी घातले, त्याच संघटना आता स्वतः पाकिस्तानच्या विनाशाचे कारण ठरत असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका पॉडकास्ट दरम्यान देशात वाढत असलेल्या दहशतवादाची आणि धोक्याची उघडपणे कबुली दिली आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांमुळे पाकिस्तानची अवस्था सीरिया आणि इराकसारखी होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.(Pakistan Politics)

दहशतवादी संघटना म्हणजे 'अनियंत्रित क्षेपणास्त्रे'

पाकिस्तानच्या पॉडकास्टवर बोलताना ख्वाजा आसिफ यांनी या दहशतवादी संघटनांची तुलना थेट अनियंत्रित क्षेपणास्त्रांशी केली आहे, जी कधीही स्वतःच्याच देशात स्फोट घडवू शकतात. या संघटनांना 'फ्रँचायझी' संबोधत ते म्हणाले, "हे लोक शस्त्रे हाती घेतात आणि सोयीनुसार आपले स्वरूप बदलतात. कधी ते अमेरिकेची लढाई लढतात, तर कधी स्वतःची किंवा दुसऱ्याची."(Pakistan Politics)

सीरिया आणि इराकचे उदाहरण देत त्यांनी इशारा दिला की, "देव न करो, पण आपली अवस्थाही तशीच होऊ नये. या दहशतवादी संघटना देशाच्या लष्कराची ताकद आणि आंतरिक सुरक्षा पोकळ करत आहेत. पाकिस्तानला अशा मिलिशियांची अजिबात गरज नाही, कारण गेल्या ४० ते ५० वर्षांच्या इतिहासाने हे सिद्ध केले आहे की या संघटनांवर कोणाचेही नियंत्रण राहत नाही."(Khawaja Asif, Defence Minister of Pakistan)

शहबाज शरीफ यांच्या जुन्या भाषणाची चर्चा

एकीकडे संरक्षणमंत्री देशांतर्गत धोक्याची कबुली देत असताना, दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या गेल्या वर्षातील संयुक्त राष्ट्र महासभेतील भाषणाचा एक व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. २० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८०व्या अधिवेशनातील या व्हिडिओमध्ये शरीफ असे म्हणताना दिसत आहेत की, "जर आम्ही या दहशतवाद्यांचा सामना केला नसता, तर ते न्यूयॉर्क आणि लंडनच्या रस्त्यांवर फिरत असते."(Pakistan Politics)

पाकिस्तानच्या मंत्र्यांची ही विधाने आणि जागतिक स्तरावर दिली जाणारी पोकळ स्पष्टीकरणे यावरून दहशतवादाचा विळखा आता स्वतः पाकिस्तानसाठीच एक गंभीर भस्मासूर बनल्याचे स्पष्ट होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादाला आश्रय दिल्याचा आरोप सातत्याने झेलणाऱ्या पाकिस्तानला आता स्वतःच्याच धोरणांमुळे अंतर्गत विनाशाचे वेध लागले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >