Wednesday, September 23, 2026

Crime News : मृतदेहाचे 9 तुकडे अन् दोन जण बेपत्ता! शारजाहमधील भारतीय व्यक्तीच्या हत्येने खळबळ; पोलिसांकडून शोध सुरू

Crime News :  मृतदेहाचे 9 तुकडे अन् दोन जण बेपत्ता! शारजाहमधील भारतीय व्यक्तीच्या हत्येने खळबळ; पोलिसांकडून शोध सुरू

शारजाह : कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील एका व्यक्तीची संयुक्त अरब अमिरातीतील शारजाहमध्ये हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्विन प्रकाश कुंदर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जुलै महिन्यात त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे 9 तुकडे करून दोन पिशव्यांमध्ये भरल्याचे समोर आले आहे. जवळपास दोन महिन्यांनंतर या घटनेचा तपशील समोर आला आहे. (Crime News)

नेमकं काय घडलं ?

प्रकाश कुंदर हे गेल्या 14 वर्षांपासून शारजाह विमानतळावर काम करत होते. ते पत्नी टीना कुंदर आणि दहावीत शिकणाऱ्या मुलासोबत शारजाहमध्ये राहत होते. प्रकाश यांची पत्नी टीना या शिक्षिका म्हणून काम करत होत्या. प्रकाश यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आणि किशोरवयीन मुलगा दोघेही बेपत्ता असल्याची माहिती आहे.

प्रकाश यांचे भाऊ अनिल प्रशांत कुंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 20 जुलैच्या आसपास प्रकाश यांना फोन केला होता. मात्र, प्रकाश यांनी फोन न उचलता आपण ठीक असल्याचा संदेश पाठवला. हा प्रकार कुटुंबीयांना काहीसा विचित्र वाटला. कारण प्रकाश सहसा व्हॉइस मेसेजद्वारे संवाद साधत होते.

यानंतर अनिल यांनी शारजाहमध्ये असलेल्या प्रकाश यांच्या मित्राशी संपर्क साधला. मित्राने प्रकाश राहत असलेल्या कंपनीच्या फ्लॅटमध्ये जाऊन चौकशी केली. त्यावेळी प्रकाश भारतात गेल्याचे वॉचमनकडून सांगण्यात आले. कंपनीच्या एचआर विभागाकडूनही सुरुवातीला अशीच माहिती देण्यात आली.

बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली

मात्र, प्रकाश भारतात परतले नसल्याचे कुटुंबीयांनी कंपनीला सांगितले. त्यानंतर त्यांच्या पासपोर्टची तपासणी करण्यात आली. या तपासणीत प्रकाश अजूनही शारजाहमध्ये असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली.

मृतदेहाचे तब्बल 9 तुकडे

पोलिसांच्या शोधादरम्यान ओमानच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एका गाडीत प्रकाश यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाचे 9 तुकडे करून ते दोन पिशव्यांमध्ये ठेवण्यात आल्याचे त्यांच्या भावाने सांगितले.

दरम्यान, प्रकाश यांच्या पत्नी आणि मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. ते भारतात आले असल्याचा दावा केला जात असला तरी त्यांचे सध्याचे ठिकाण स्पष्ट झालेले नाही. या दोघांचा हत्येशी काही संबंध आहे का, याचीही स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. हत्येचा नेमका हेतू आणि आरोपींबाबत शारजाह प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >