
ठाणे: ठाण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या तलावपाळी (मासुंदा तलाव) परिसरात शुक्रवारी रात्री एक थरारक घटना समोर आली. बोटिंग सेंटर आणि प्रिसिजन फिशरीज जवळ एका 32 वर्षीय महिलेने तलावात उडी मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आणि नौपाडा पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली आणि एका मोठ्या दुर्घटनेला टाळले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी 6 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 9.22 च्या सुमारास ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला एका प्रत्यक्षदर्शीने कॉल करून या घटनेची माहिती दिली. तलावपाळीच्या पाण्यात एका महिलेने उडी मारल्याचे कळताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. रेश्मा खंदारे (वय 32 वर्षे) असे उडी मारणाऱ्या महिलेचे नाव असल्याचे तपासात उघड झाले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय. एम. ताडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF), आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि नौपाडा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल झाले.
ठाणे : ठाण्यातील गजबजलेल्या उथळसर परिसरात एक मोठी दुर्घटना टळली आहे. येथील डॉ. आंबेडकर रोडवर, प्रतीक्षा टॉवरजवळ आणि स्काय पिलर सोसायटीच्या समोर ...
तलावात उडी मारलेली महिला पाण्यात बुडत असल्याचे पाहून आपत्ती प्रतिसाद दलाचे धाडसी जवान किरण घोडे आणि राजेंद्र नागरे यांनी अजिबात वेळ न घालवता तातडीने बोटीच्या साहाय्याने पाण्यात प्रवेश केला. रात्रीची वेळ आणि पाण्याचा अंदाज नसतानाही या जवानांनी अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने त्या महिलेपर्यंत पोहोचून तिला सुखरूप बाहेर काढले. जवानांच्या सतर्कतेमुळे आणि ऐनवेळी मिळालेल्या मदतीमुळे 32 वर्षीय महिलेचा जीव वाचवण्यात यश आले आहे. तलावातून सुखरूप बाहेर काढल्यानंतर महिलेला प्रथमोपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, या महिलेने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? तिने तलावात उडी मारण्यामागचे कारण काय होते? याचा तपास आता नौपाडा पोलीस करत आहेत. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव की अन्य काही वैयक्तिक कारण आहे, यादृष्टीने पोलीस तिची आणि तिच्या नातेवाईकांची चौकशी करत आहेत. शुक्रवारी रात्री तलावपाळीवर पर्यटकांची आणि स्थानिकांची गर्दी असते. अशा वेळी घडलेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तातडीने केलेल्या कारवाईमुळे एका दुर्दैवी मृत्यूचा धोका टळला असून नागरिकांकडून रेस्क्यू टीमचे कौतुक केले जात आहे.




