पुणे : येत्या २५ सप्टेंबरला (शुक्रवारी) अनंत चतुर्दशी दिवशी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका नेहमीच भव्यता आणि उत्साहासाठी देशभरात प्रसिद्ध असतात. यंदाची विसर्जन मिरवणूक अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुलभ व्हावी यासाठी पुणे शहर पोलिसांकडून कडक बंदोबस्त आणि अत्याधुनिक नियोजन करण्यात आले आहे. पोलिसांचे सुमारे १० हजार अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर तैनात असणार असून संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.
'एका क्लिकवर' मिरवणुकीचे लाईव्ह ट्रॅकिंग आणि अपडेट्स
विसर्जन मिरवणुकीदरम्यान पुणेकरांना गर्दीचा त्रास होऊ नये आणि वेळेचे नियोजन करता यावे, यासाठी पुणे पोलिसांकडून diversion.Punepolice.Gov.in ही विशेष डिजिटल प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वेबसाईटद्वारे नागरिकांना खालील महत्त्वाची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे, मानाच्या आणि प्रमुख गणेश मंडळांच्या मिरवणुका सध्या कोणत्या रस्त्यावर आणि कोणत्या दिशेने चालल्या आहेत, याचे थेट लाईव्ह लोकेशन पाहता येईल. विसर्जन मिरवणुकीचे सर्वात पुढील व शेवटचे टोक कुठे आहे, यावरून कोणते रस्ते कधी बंद किंवा खुले होणार याची अचूक माहिती नागरिकांना मिळेल. बंद करण्यात आलेले रस्ते, वळवण्यात आलेले पर्यायी मार्ग, तसेच शहरात निश्चित करण्यात आलेल्या २६ पार्किंग स्थळांची माहिती त्वरित उपलब्ध होईल. गुगल मॅप्सच्या सहकार्याने रस्ते खुले किंवा बंद असण्याबाबतचे अपडेट्स रिअल-टाईममध्ये दिले जातील.
मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनने (Kaartik Aryan) त्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि पहिला वहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ...
वाहतुकीसाठी बंद असणारे प्रमुख रस्ते
लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता या चार मुख्य मार्गांवरून तब्बल ६३८ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजेपासून ते २६ सप्टेंबरला मिरवणूक संपेपर्यंत पुढील प्रमुख मार्गांवर वाहतूक पूर्णपणे बंद राहील:
१. लक्ष्मी रस्ता: संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक (पहाटे ५ पासून)
२. कर्वे रस्ता: नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक (पहाटे ५ पासून)
३. शिवाजी रस्ता: काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक (सायंकाळी ६ पासून)
४. जंगली महाराज रस्ता: झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक (सायंकाळी ६ पासून)
५. इतर मुख्य रस्ते: बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, गणेश रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता आणि प्रभात रस्ता यांवर सकाळी १० वाजेपासून वाहतूक बंद केली जाईल.
पर्यायी मार्ग आणि 'रिंग रोड'चा वापर
शहरातील अंतर्गत वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून पोलिसांनी पर्यायी 'रिंग रोड' निश्चित केला आहे. यामध्ये कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातून लॉ कॉलेज रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, संचेती हॉस्पिटल, इंजिनिअरिंग कॉलेज, शाहीर अमर शेख चौक, मालधक्का, नेहरू रस्ता, सातारा रस्ता आणि म्हात्रे पुलाचा वापर करून वाहने वळवली जातील. मिरवणूक संपेपर्यंत या मार्गांवर दुहेरी वाहतूक सुरू राहील.
नो-पार्किंग आणि जड वाहनांना पूर्णबंदी
२४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून मुख्य विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, एफसी रस्ता आणि जेएम रस्त्यावर पार्किंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच खंडोजीबाबा चौक ते हॉटेल वैशाली या जोड रस्त्यांच्या १०० मीटर परिसरातही नो-पार्किंग लागू असेल. नागरिकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून २५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२:०१ वाजेपासून पुढील ४८ तासांसाठी (२६ सप्टेंबर रोजी रात्री २४:०० वाजेपर्यंत) संपूर्ण पुणे शहरात सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या (Heavy Vehicles) प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.