Wednesday, September 23, 2026

Thane Fire News : ठाणे जिल्ह्यात आगीच्या ३ वेगवेगळ्या घटना : १४ वीज मीटर, ५ घरे आणि १४ गाड्या जळून खाक

Thane Fire News : ठाणे जिल्ह्यात आगीच्या ३ वेगवेगळ्या घटना : १४ वीज मीटर, ५ घरे आणि १४ गाड्या जळून खाक

ठाणे : ठाणे शहर आणि आसपासच्या परिसरात आगीच्या तीन वेगवेगळ्या दुर्घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने, या तिन्ही दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र नागरिकांचे मोठे आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

ठाण्यातील पत्रकार सोसायटीत मीटर बॉक्सला आग; १४ मीटर जळून खाक

ठाण्यातील कोपरी भागात असलेल्या तीन मजली ‘पत्रकार सोसायटी’मध्ये बुधवारी मध्यरात्रीनंतर अचानक आग लागली. ही आग इमारतीचे विजेचे मीटर असलेल्या खोलीत लागली होती. आगीच्या तीव्रतेमुळे काही वेळातच १४ विजेचे मीटर पूर्णपणे जळून खाक झाले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १२:२० वाजता या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल, आपत्कालीन पथक आणि वीज कंपनीचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्री १ वाजेपर्यंत आगीवर पूर्णपणे ताबा मिळवला. वेळेवर मदत पोहोचल्यामुळे आग वरच्या मजल्यांवर पसरली नाही आणि मोठा अपघात टळला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक संशय असून अधिक तपास सुरू आहे.

२. कळव्यात गॅस सिलिंडरचा स्फोट; ५ घरे जळून खाक

दुसरी घटना १८ सप्टेंबर रोजी कळवा (पश्चिम) येथील खारेगाव पुलामागे असलेल्या झोपडपट्टीत घडली. तेथे एका घरात गॅस सिलिंडरचा अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत परिसरातील ५ कच्ची घरे पूर्णपणे जळून खाक झाली. सकाळी ९:२३ वाजता या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. सुदैवाने, आग लागली तेव्हा या पाचही घरांमध्ये कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अग्निशामक दलाने तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले.

३. भिवंडीत पार्किंगमध्ये भीषण आग; १४ दुचाकी जळून खाक

तिसरी घटना भिवंडीतील खांडूपाडा परिसरातील ‘उमर अपार्टमेंट’मध्ये घडली. १६ सप्टेंबर रोजी इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि आग लागली. ही आग इतकी वेगाने पसरली की तेथे उभ्या असलेल्या १४ दुचाकी गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. भिवंडी-निझामपूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या घटनेनंतर स्थानिक माजी नगरसेवक माहिम शेगी आणि रहिवाशांनी वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे, तसेच अग्निशामक दल उशिरा पोहोचल्याची तक्रारही केली आहे. याप्रकरणी शांती नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >