Thursday, September 24, 2026

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीसाठी मुंबई महापालिकेची जय्यत तयारी; 25 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीसाठी मुंबई महापालिकेची जय्यत तयारी; 25 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने व्यापक तयारी केली आहे. विसर्जन सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी 25 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले असून, नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवर मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (Ganeshotsav 2026)

67 नैसर्गिक, 278 ठिकाणी कृत्रिम तलाव

मुंबईत 67 नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि 278 ठिकाणी 383 हून अधिक कृत्रिम तलाव उपलब्ध करण्यात आले आहेत. 6 फूट उंचीपर्यंतच्या गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सुरक्षेसाठी 1,132 जीवरक्षक, 85 रुग्णवाहिका, 34 क्रेन, 23 जर्मन तराफे आणि 10 मोटरबोट सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच 6,052 फ्लडलाईट आणि सर्चलाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. (Ganeshotsav 2026)

गिरगाव चौपाटीवर विशेष बंदोबस्त

स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे 12 कृत्रिम तलाव, 20 निरीक्षण मनोरे, 22 तराफे, 90 प्रसाधनगृहे आणि 2,000 मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, 3 रुग्णवाहिका, 548 फ्लडलाईट आणि 11 सर्चलाईटसह समन्वय कक्ष व पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. (Ganeshotsav 2026)

‘एक गणपती, एक झाड’ उपक्रम

महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून ‘एक गणपती, एक झाड’ उपक्रम राबवण्यात येत आहे. विसर्जित होणाऱ्या गणेशमूर्तींच्या संख्येइतकी झाडे लावण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी आतापर्यंत 940 मेट्रिक टनांहून अधिक शाडू माती मोफत वितरित करण्यात आली असून, यंदा 25,400 लिटर पर्यावरणपूरक रंगही विनामूल्य देण्यात आले आहेत. (Ganeshotsav 2026)

विसर्जन मार्गांचीही दुरुस्ती

आगमन आणि विसर्जन मार्गांवरील 506 रस्त्यांवरील 4,279 खड्डे तसेच 171 ड्रेनेज कव्हर्स दुरुस्त करण्यात आले आहेत. 281 ठिकाणच्या अडथळा ठरणाऱ्या केबल्स हटवण्यात आल्या असून 515 ठिकाणी वृक्षछाटणी करण्यात आली आहे. (Ganeshotsav 2026)

आतापर्यंत 1.63 लाखांहून अधिक मूर्तींचे विसर्जन

यंदाच्या गणेशोत्सवात आतापर्यंत 1 लाख 63 हजार 386 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आहे. यात दीड दिवसांच्या उत्सवातील 63,312, पाच दिवसांच्या उत्सवातील 36,992, सहा दिवसांच्या उत्सवातील 44,261 आणि सात दिवसांच्या उत्सवातील 18,821 मूर्तींचा समावेश आहे.

समुद्रकिनारी ‘ब्ल्यू बटन जेलीफिश’ आणि ‘स्टिंग रे’चा वावर लक्षात घेता नागरिकांनी समुद्रात उतरताना खबरदारी घ्यावी आणि महापालिका व पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Ganeshotsav 2026)

दरम्यान, गिरगाव चौपाटीवर आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात येणार असून, महापालिका, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, एनडीआरएफ, बेस्ट आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणांमध्ये तातडीने समन्वय साधला जाणार आहे. (Ganeshotsav 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >