Monday, November 9, 2026

700 ग्रॅम बाळाचं वजन 3.3 कि.ग्रॅमवर नेलं; केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी बाळाला दिलं जीवनदान

मुंबईच्या केईएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अवघ्या 700 ग्रॅम वजनाच्या आणि अत्यंत अपुऱ्या दिवसांच्या नवजात बाळाला पाच महिन्यांच्या अतिदक्षता उपचारानंतर नवीन जीवनदान दिले आहे.

मुंबई: मुंबईतील केईएम रूग्णालयातील डॉक्टरांनी एका बाळाला जीवनदान दिले आहे. आई 7 महिन्यांची गर्भवती असतानाच जन्माला आलेल्या बाळाला परळच्या केईएम हॉस्पिटल (KEM Hospital) मधील डॉक्टरांनी नव संजीवनी दिली आहे. या बातमीमुळे सध्या केईएम रूग्णालयातील डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. मुदतीच्या आधी जन्मलेल्या आणि जन्मत: अवघ्या 700 ग्रॅम वजन असलेल्या चिमुकल्या बाळाला डॉक्टरांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे.

तब्बल पाच महिने नवजात बाळाला अतिदक्षता विभागामध्ये (NICU) उपचार सुरू होते. ते बाळ पूर्णपणे निरोगी झाल्यानंतरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. जन्माला आला तेव्हा बाळाचं वजन जेमतेम 700 ग्रॅमच होतं, पण त्यावर पुरेपूर औषधोपचार केल्यानंतर त्या बाळाचं वजन 3.3 कि.ग्रॅम पर्यंत पोहोचले आहे. बाळाची पूर्णपणे वाढ आईच्या स्तनपानावर होत असल्यामुळे, बाळाला नुकतेच डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2 जून 2026 रोजी या बाळाचा जन्म झाला होता. जन्माच्या वेळी बाळाचे वजन केवळ 700 ग्रॅम असल्यामुळे बाळाच्या आरोग्याबद्दल सतत चिंता भेडसावत होती. परंतु केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या अथक प्रयत्नाने त्या बाळाला मृत्यूच्या कवेतून पुन्हा आणले आहे.

बाळ आईच्या गर्भामध्ये असताना डॉपलरच्या चाचण्यांमध्ये काही गुंतागुंत आढळल्याने प्रसूतीसाठी या मातेला मरोळच्या रमाबाई रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु, संपूर्ण प्रकरण गुंतागुंतीचे असल्यामुळे त्या महिलेला थेट केईएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. केईएम रुग्णालयातील नवजात बाळाच्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता हरिबालकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफच्या टीमने या बाळावर अहोरात्र मेहनत घेतली. पाच महिने चाललेल्या या उपचारादरम्यान बाळाला अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला. परंतु, डॉक्टरांच्या उपचारांमुळे आणि सामूहिक प्रयत्नांमुळे बाळाची प्रकृती सुधारत गेली.

सततच्या देखरेखीखाली आणि विशेष वैद्यकीय उपचारामुळे बाळाचे वजन सुरुवातीच्या 700 ग्रॅमवरून थेट 3.3 किलोवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, बाळाची पूर्णपणे वाढ आईच्या स्तनपानावर होत असल्यामुळे, बाळाला नुकतेच डिस्चार्ज देण्यात आला आहे. सर्व आवश्यक टप्पे पार केल्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी बाळाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये किती उच्च दर्जाची आणि प्रभावी वैद्यकीय सेवा दिली जाते, याचे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे. केईएम हॉस्पिटलचे डीन डॉ. हरीश पाठक यांनीही या संपूर्ण टीमच्या कामाचे कौतुक केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >