Thursday, September 24, 2026

FDA Raid Maharashtra : सण-उत्सवांच्या काळात अन्न सुरक्षेसाठी FDAची राज्यभर विशेष मोहीम; ९.७६ कोटी रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त

FDA Raid Maharashtra : सण-उत्सवांच्या काळात अन्न सुरक्षेसाठी FDAची राज्यभर विशेष मोहीम; ९.७६ कोटी रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त

मुंबई : महाराष्ट्रात सण-उत्सवांच्या काळात भाविकांना शुद्ध आणि भेसळमुक्त अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. सणांच्या काळात मोदक, पेढे, खवा, पनीर, तूप आणि भगर, साबुदाण्यासारख्या उपवासाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. या काळात भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र ऑनलाईन "सण-उत्सव अंमलबजावणी पोर्टल" सुरू केले असून, या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ६,३४,३६२ किलो (सुमारे ९.७६ कोटी रुपये मूल्याचा) संशयित अन्नसाठा जप्त केला आहे.

">गणेश मंडळांचा ऑनलाईन प्रतिसाद आणि पाहणी

गणेशोत्सवाच्या काळात महाप्रसाद, भंडारा आणि अन्नछत्रासाठी राज्यातील गणेश मंडळांनी या ऑनलाईन पोर्टलवर ३,१९८ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी धोके धोरणानुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ३८३ ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन अन्न शिजवण्याची जागा, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. प्रशासनाच्या या मार्गदर्शनामुळे सामूहिक विषबाधेचा धोका टळून भाविकांना सुरक्षित प्रसाद मिळाला.

१ ते २३ सप्टेंबरदरम्यान झालेली कडक कारवाई

दिनांक १ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एफडीएने राज्यभरात ३,०६८ अन्न आस्थापनांची तपासणी केली. यामध्ये किरकोळ त्रुटी आढळलेल्या १,५०६ दुकानांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर गंभीर नियमभंग करणाऱ्या २४८ आस्थापनांचे परवाने निलंबित आणि १२ आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले. तसेच कायद्याच्या कलम ६९ नुसार ४५५ प्रकरणे दाखल करून ३९८ प्रकरणे निकाली काढण्यात आली व ५३.६० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

विभागनिहाय कारवाई आणि नाशिकमध्ये सर्वाधिक जप्ती

प्रशासनाने राज्यभरातून मिठाई, दुग्धजन्य पदार्थ व उपवासाच्या पदार्थांचे एकूण २,४२३ नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी पाठवले आहेत.

बृहन्मुंबई: ३२५ तपासण्या, २२६ सुधारणा नोटिसा, ५३ परवाने निलंबित, १ रद्द, ८८ अन्न नमुने आणि ४,२०३.५५ किलो साठा (₹१६.२४ लाख) जप्त.

कोकण विभाग: ९७७ तपासण्या, ४१५ सुधारणा नोटिसा, ७० परवाने निलंबित, १ रद्द, ९०३ अन्न नमुने आणि १,२४,७९३.८६ किलो साठा (₹१५३.७४ लाख) जप्त.

पुणे विभाग: ८४९ तपासण्या, ४४० सुधारणा नोटिसा, ६९ परवाने निलंबित, ६७२ अन्न नमुने आणि ४६,२६६.०२ किलो साठा (₹१५२.२४ लाख) जप्त.

नाशिक विभाग: २२१ तपासण्या, १०९ सुधारणा नोटिसा, ९ परवाने निलंबित, २२४ अन्न नमुने आणि राज्यात सर्वाधिक ४,४२,७४६.४० किलो साठा (₹६२२.६८ लाख / सुमारे ६.२३ कोटी रुपये) जप्त.

छत्रपती संभाजीनगर विभाग: ४०२ तपासण्या, १५६ सुधारणा नोटिसा, २४ परवाने निलंबित, २३२ अन्न नमुने आणि १५,१८०.८० किलो साठा (₹२८.८० लाख) जप्त.

अमरावती विभाग: १३६ तपासण्या, ५८ सुधारणा नोटिसा, ११ परवाने निलंबित, ३ रद्द, १३२ अन्न नमुने आणि २१६ किलो साठा (₹०.१६ लाख) जप्त.

नागपूर विभाग: १५८ तपासण्या, १०२ सुधारणा नोटिसा, १२ परवाने निलंबित, ७ रद्द, १७२ अन्न नमुने आणि ९५५.४० किलो साठा (₹१.७३ लाख) जप्त.

भाविकांना आणि नागरिकांना खबरदारीचे आवाहन

अन्न व औषध प्रशासना यांनी स्पष्ट केले की, ही कारवाई भाविकांच्या श्रद्धेचे आणि आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आहे. नागरिकांनी मिठाई व उपवासाचे पदार्थ परवानाधारक दुकानातूनच खरेदी करावेत आणि दुकानातील "Food Safety Connect" QR कोड व पक्के बिल तपासावे. नवरात्र व आगामी सणांमध्ये महाप्रसाद किंवा अन्नछत्र आयोजित करणाऱ्या मंडळांनी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तक्रारीसाठी नागरिकांनी १८०० २२२ ३६५ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा https://complaints.mahafda.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >