Thursday, September 24, 2026

Jalgaon Cyber Crime: जिल्हाधिकाऱ्यांच्या अपघाताची माहिती अन् तलाठ्याला 12 हजारांचा ऑनलाइन गंडा ; नेमकं काय घडलं ?

Jalgaon Cyber Crime: जिल्हाधिकाऱ्यांच्या अपघाताची माहिती अन् तलाठ्याला 12 हजारांचा ऑनलाइन गंडा ; नेमकं काय घडलं ?

Jalgaon Cyber Crime : अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे समोर आला आहे. पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अपघात झाल्याची खोटी माहिती देत त्यांच्या उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगण्यात आले. या आमिषाला बळी पडून पाचोरा महसूल विभागातील एका तलाठ्याने 12 हजार रुपये ऑनलाइन पाठवले. ही घटना 18 सप्टेंबर रोजी घडली असून, फसवणूक लक्षात आल्यानंतर तलाठी अतुल पाटील यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात (Pachora Police Station) तक्रार दाखल केली आहे.

तहसीलदारांच्या नावाने आला फोन

अतुल पाटील यांना भडगावच्या तहसीलदार शीतल सोलाट यांच्या नावाने फोन करण्यात आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा पाचोऱ्याजवळ अपघात झाल्याचे सांगितले. तसेच अपघातग्रस्त जिल्हाधिकाऱ्यांना पाचोऱ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगून पाटील यांना तातडीने रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. यानंतर पाटील यांनी संबंधित 7499056525 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. समोरच्या व्यक्तीने आपली ओळख अपघातग्रस्त व्यक्ती म्हणून करून दिली आणि उपचारासाठी 20 हजार रुपये ऑनलाइन पाठवण्याची विनंती केली. पाटील यांनी त्यावर विश्वास ठेवत 12 हजार रुपये ऑनलाइन पाठवले. मात्र, पैसे पाठवल्यानंतर संबंधित व्यक्तीशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाइल बंद असल्याचे आढळले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा संशय पाटील यांना आला.

चौकशीनंतर अपघाताची माहिती खोटी असल्याचे स्पष्ट

तलाठी अतुल पाटील यांनी तातडीने तहसीलदार शीतल सोलाट यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा असा कोणताही अपघात झालेला नसल्याचे स्पष्ट झाले.आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात (Pachora Police Station) तक्रार दाखल केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ज्या मोबाइल क्रमांकावरून संपर्क करण्यात आला, तो रविकांत मधुकर फसाळे (रा. मोरचुंड, ता. मोखाडा, जि. पालघर) यांच्या नावावर असल्याचे समोर आल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून मदतीच्या बहाण्याने पैसे उकळल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी पाचोरा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >