Thursday, September 24, 2026

Nashik Ganesh Visarjan 2026 : विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक चौकात फक्त 20 मिनिटे ! मंडळांसाठी पोलिसांचा नवा फॉर्म्युला

Nashik Ganesh Visarjan 2026 : विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक चौकात फक्त 20 मिनिटे ! मंडळांसाठी पोलिसांचा नवा फॉर्म्युला

Nashik Ganesh Visarjan : गणेश विसर्जनाच्या मुख्य मिरवणुकीत होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक पोलिसांनी यंदा विशेष नियोजन केले आहे. मिरवणुकीत विनाकारण वेळ घेणाऱ्या गणेश मंडळांना आणि चौकांमध्ये बराच वेळ थांबणाऱ्या ढोल-ताशा पथकांना आता वेळेचे काटेकोर नियोजन पाळावे लागणार आहे. मुख्य मिरवणूक मार्गावरील प्रत्येक चौकात गणेश मंडळांना जास्तीत जास्त 20 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. या वेळेत मंडळाने पुढे मार्गस्थ होणे अपेक्षित आहे. दोन मंडळांमध्ये अनावश्यक अंतर निर्माण होऊन मिरवणुकीचा प्रवाह विस्कळीत झाल्यास संबंधित मंडळावर उत्सवानंतर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

चौकांमध्ये तासन्‌तास थांबण्याला आळा

दरवर्षी विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही मंडळे आणि ढोल-ताशा पथके प्रमुख चौकांमध्ये दीर्घकाळ थांबतात. त्यामुळे मागून येणाऱ्या मंडळांची मिरवणूक खोळंबते आणि संपूर्ण मार्गावर गर्दी वाढते. ही परिस्थिती टाळण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वेळेचे नियोजन करण्यात आले आहे. चौकात दिलेल्या वेळेत कार्यक्रम पूर्ण करून पुढे जाण्याच्या सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत.

ढोल-ताशा पथकांनाही नियम लागू

मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा पथकांची संख्या आणि त्यांच्या हालचालींमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे वादकांची संख्या मर्यादित ठेवण्यासोबतच रस्ता जास्त काळ अडवला जाणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय लेझर लाईट्स आणि डीजेवर बंदी कायम राहणार आहे. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची मिरवणूक मार्गावर प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे.

अशी असेल विसर्जन मिरवणुकीची वेळ

- सकाळी 10 वाजता: वाकडी बारव येथे गणेश मंडळांचे रथ, देखावे आणि गणेशमूर्ती एकत्र जमा होतील.

- सकाळी 11 वाजता: मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीला औपचारिक सुरुवात होईल.

- रात्री 12 वाजता: मुख्य मिरवणूक संपवण्यात येईल. त्यानंतर केवळ गणेशमूर्ती विसर्जनस्थळी नेण्यास परवानगी असेल.

प्रत्येक मंडळासोबत पोलीस अधिकारी

मिरवणुकीमध्ये मंडळांमध्ये जास्त अंतर पडू नये आणि गर्दीचा प्रवाह सुरळीत राहावा यासाठी प्रत्येक गणेश मंडळासोबत एक पोलीस अधिकारी तैनात करण्यात येणार आहे. संपूर्ण मिरवणूक मार्गावर नियंत्रण कक्ष आणि संबंधित पोलीस ठाण्यांमधून ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. तसेच मिरवणूक मार्गावर आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे. राजकीय आणि सामाजिक स्वागत कक्षांमधून अनावश्यकपणे मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यासही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची विसर्जन मिरवणूक वेळेत, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यावर पोलिसांचा भर असणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >