Nashik Crime News : गणेशोत्सवाच्या सुट्टीसाठी मूळ गावी आलेल्या मुंबई महापालिकेच्या (BMC) एका अधिकाऱ्याची इगतपुरी तालुक्यात हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री एका महिलेसोबत बोलत असलेल्या अधिकाऱ्यावर महिलेने आणि तिच्या दोन मुलांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. मृत अधिकाऱ्याचे नाव राधाकिसन तुकाराम वारघडे (वय ५३, रा. गरुडेश्वर, ता. इगतपुरी) असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिच्या दोन मुलांना अटक केली असून, न्यायालयाने तिघांना सात दिवसांची पोलीस कोठडी (Seven days of police custody) सुनावली आहे. अनैतिक प्रेमसंबंधातून ही थरारक हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (Igatpuri Crime News)
लाठ्याकाठ्यांनी मारहाण, डोक्यातही प्रहार
मिळालेल्या माहितीनुसार, बीएमसी अधिकारी राधाकिसन वारघडे (BMC officer Radhakisan Warghade) हे गणेशोत्सवानिमित्त सुट्टी काढून आपल्या गरुडेश्वर या मूळ गावी आले होते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ते गावातीलच संशयित महिला वंदना कुंदे हिच्या घराजवळ गेले होते आणि तिच्याशी बोलत उभे होते. त्या दोघांना एकत्र बोलताना पाहून वंदनाची मुलं किरण दिनेश कुंदे (वय २२) आणि दिपक दिनेश कुंदे (वय २६) यांचा राग अनावर झाला. दोघा भावांनी आणि आई वंदना दिनेश कुंदे (वय ४५) यांनी संगनमत करून वारघडे यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवला.याचदरम्यान त्यांच्या डोक्यावर कठीण वस्तूने प्रहार झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वारघडे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांचे पुतणे कुणाल वारघडे (वय २५) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. (Igatpuri Crime News)
Kolhapur Accident News : रेल्वे रुळावरून चालताना मोबाईलवर बोलणे आणि कानात इअरबड्स असणे एका १७ वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना कोल्हापुरातील ...
महिलेसह दोन्ही मुलांना अटक
घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलिसांनी (Wadivarhe police station) घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पोलिसांनी वंदना कुंदे आणि त्यांचे दोन्ही मुलगे किरण व दिपक यांना ताब्यात घेत अटक केली. तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी (Police custody) सुनावली आहे. दरम्यान, या हत्येमागे वैयक्तिक संबंध आणि त्यातून निर्माण झालेला वाद कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण आणि घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार असून, वाडीवऱ्हे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.