Nagpur: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संपूर्ण दिवसभर नागपूर येथील दुष्काळग्रस्त भागात भेट देऊन त्यांच्या बांधावर जाऊन, त्यांच्यातील एक होऊन घालवला. दुष्काळामुळे हवालदिल शेतकऱ्यांना बळ, आत्मविश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकरी कुटुंबात मुक्काम केला. सकाळी उठल्यानंतर तर्री पोह्याचा नास्ता घेतला. तुमच्यासोबत दिवस आनंदात गेला. छान झोप लागली, अशी कृतज्ञता मुख्यमंत्र्यांनी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांचे घर सोडतांना व्यक्त केली. पुढल्या वर्षी वहिनींना सोबत घेऊन या, अशी विनंती भावाच्या आपुलकीने औक्षण केल्यानंतर अरूणाताईंनी मुख्यमंत्र्यांना केली.
नागपूर येथील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे काल मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. गावातच रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्यांच्या घरी काल त्यांनी सायंकाळचे भोजन घेतले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कुटुंबियांशी गप्पा करत मुक्काम केला. सकाळी उठल्यानंतर नाष्ट्यात घरच्या महिलांनी बनविलेला तर्री पोहा खाल्ला. पोहा मला आवडतो. आठवड्यातून किमान चार दिवस नास्त्यात पोहा असतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबियांशी गप्पा करतांना सांगितले.
रात्री थंडी असल्याने कुटुंबियांनी घराच्या परिसरातच शेकोटी लावली होती. यावर फडणवीस यांनी, तुम्ही मला सांगितले नाही; मी सुद्धा खुप दिवसानंतर शेकोटीचा आनंद घेतला असता, असे सांगितले. तर बहिनीच्या नात्याने अरूणाताईंनी, दादा आपण आमच्याकडे आवर्जून आले, आम्हाला आनंद झाला. पुढच्या वर्षी वहिनींना सोबत घेऊन या, अशी विनवणी मुख्यमंत्र्यांना केली. मुंबईत राहणाऱ्या रामेश्वरी सावरकर या कुटुंबातील नातेवाईक महिलेशी मोबाईलवर संवाद साधला. मुंबईत काही अडचण असल्यास नक्की भेटा, असे मोबाईलवर बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले.
नारायणीची पहिली दिवाळी मुख्यमंत्र्यांसोबत
शेतकरी रामभाऊ बालपांडे व त्यांची पत्नी अरूणाताई यांनी घरच्या सदस्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे आदरातिथ्य केले. त्यांची मुले प्रवीण व अजय तसेच सुना राणी व स्वाती यांनी स्वतःच्या हाताने जेवण बनवून त्यांना खावू घातले. तर त्यांच्या कुटुंबातील नात नारायणी केवळ 7 महिन्यांची चिमुकली. ही तिची पहिलीच दिवाळी. तिची पहिलीच दिवाळी मुख्यमंत्र्यांसोबत साजरी झाली. मोठी झाल्यानंतर आम्ही तिला फोटो दाखवू, असे तिचे वडील प्रवीण यांनी आनंदाच्या भरात सांगितले.
दिवाळी निमित्त अभ्यंगस्नान व भाऊबीज
सकाळी उठल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कुटुंबातच दिवाळी सणानिमित्त अभ्यंगस्नान केले. यावेळी अरूणाताईंनी मुख्यमंत्र्यांना भाऊबीज केली. घरातील सर्व महिलांनी पारंपरिक पद्धतीने ओवाळनी व औक्षवन केले. मुख्यमंत्र्यांनी देखील शेतकरी बहिनीच्या ताटात ओवाळणी घातली.
पत्रकारांशी संवाद
लोहारी सावंगा गाव सोडतांना मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकरी कुटुंबात मुक्काम केल्यानंतर आपल्या भावना काय आहेत? असा प्रश्न विचारल्यानंतर बालपांडे कुटुंबाशी जवळीक झाली. त्यांनी छान आदरातिथ्य केले. शेतकरी रामभाऊ बालपांडे यांना देखील दुष्काळाचा फटका बसला. त्यांनी हार मानली नाही. कुटुंबातील तीन खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, याचे समाधान वाटले. बालपांडे कुटुंब वारीला जातात. विठ्ठलाची अर्चना करणारा परिवार कधीही हतबल होत नाही. विपरीत परिस्थितीचा सामना करण्याचे बळ त्यांच्यात असते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सकाळी नास्ता घेत असतांना 75 वर्षांच्या कमलाबाई मानेराव मुख्यमंत्र्यांना भेटल्या. वयमानाने कामधंदा होत नाही. त्यामुळे बकरी पालनाचा प्रस्ताव व अपंग मुलाला आर्थिक मदतीचे प्रकरण करून देण्याची विनंती त्यांनी केली. त्यावर तातडीने कारवाई करण्यासोबतच कमलाबाईचे निराधार अनुदानाचे प्रकरण करता येईल का? याची पडताळणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.