Thursday, September 24, 2026

Nashik Shalarth Scam : बनावट शालार्थ आयडीधारक शिक्षक पोलिसांच्या रडारवर, संजय गरूडच्या जामीन अर्जावर 30 सप्टेंबरला सुनावणी

Nashik Shalarth Scam : बनावट शालार्थ आयडीधारक शिक्षक पोलिसांच्या रडारवर, संजय गरूडच्या जामीन अर्जावर 30 सप्टेंबरला सुनावणी

Nashik Shalarth Scam : बहुचर्चित शालार्थ घोटाळ्याच्या तपासाला आता वेग आला असून, बनावट शालार्थ आयडी मिळवलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चौकशी नाशिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. संबंधितांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलावून त्यांच्याकडून विविध बाबींवर कसून माहिती घेतली जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयितांपैकी एक असलेला शिक्षण संस्थाचालक संजय गरूड याने पुन्हा एकदा जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. नवीन वकिलांमार्फत त्याने नाशिकरोड न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून, या अर्जावर 30 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

841 शिक्षक-कर्मचाऱ्यांचे आयडी बनावट

तपासादरम्यान नाशिक विभागातील तब्बल 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचे समोर आले आहे. यामध्ये एकट्या जळगाव जिल्ह्यातील 638 जणांचा समावेश असल्याची माहिती आहे.या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना बनावट आयडी मिळवणाऱ्या संबंधित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून या संपूर्ण प्रक्रियेबाबत माहिती घेतली जात आहे.

आतापर्यंत आठ जणांना अटक

शालार्थ घोटाळ्याच्या तपासात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये राज्य शिक्षण मंडळाचे सेवानिवृत्त अध्यक्ष असल्याचे नमूद करण्यात आलेले संशयित नितीन उपासनी, माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, शिक्षण संस्थाचालक प्रशांत वाडीले, संजय गरूड, दीपक गरूड आणि लॅब असिस्टंट तुषार साळुंके यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

संजय गरूडला पुन्हा ताब्यात घेणार?

अटकेनंतर वैद्यकीय कारणास्तव संजय गरूड याच्यावर जिल्हा रुग्णालयातील मध्यवर्ती कारागृह कक्षात उपचार सुरू होते. सध्या तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहे. दरम्यान, या प्रकरणातील तपास पुढे नेण्यासाठी त्याची सखोल चौकशी आवश्यक असल्याचे तपास पथकाचे म्हणणे आहे. त्यामुळे संजय गरूडला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी विशेष तपास पथक न्यायालयाकडे मागणी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. आता एकीकडे बनावट शालार्थ आयडीधारकांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे संजय गरूडच्या जामीन अर्जावर 30 सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >