Thursday, September 24, 2026

Pune Crime News : पोलीस दलात खळबळ ! अल्पवयीन मुलांना पट्ट्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ करणं भोवलं ; वरिष्ठ अधिकाऱ्यासह 11 पोलिसांना दणका

Pune Crime News : पोलीस दलात खळबळ ! अल्पवयीन मुलांना पट्ट्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ करणं भोवलं ; वरिष्ठ अधिकाऱ्यासह 11 पोलिसांना दणका

Pune Crime News : पुण्यातील पोलीस दलात खळबळ उडवून देणारी आणि कायदा-सुव्यवस्थेचे नियम वेशीवर टांगणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. आंबेगाव पठार पोलीस चौकीत तब्बल ८ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीररित्या डांबून ठेवण्यात आलं. त्यांना बेल्टने बांधून बेदम मारहाण केल्याप्रकरणी आणि त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आता ११ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.

20 आणि 21 जुलै 2026 रोजी आठ अल्पवयीन मुलांना आंबेगाव पठार पोलीस चौकीत आणण्यात आले होते. या मुलांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवून बेल्टने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (NHRC) कठोर आदेशानंतर सीआयडी (CID) च्या फॅक्ट फाईंडिंग रिपोर्टच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, 20 जुलै रोजी चार अल्पवयीन मुलांना, तर 21 जुलै रोजी आणखी चार मुलांना पोलिसांनी आंबेगाव पठार चौकीत आणले. त्यामुळे एकूण आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप आहे. या मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर न करता पोलीस कोठडीत ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, त्यांच्यासोबत मारहाणीचा प्रकार घडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात बालकल्याण पोलीस अधिकारी उपस्थित नसताना अहवाल तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. याप्रकरणातील अल्पवयीन मुले 1, 3, 7 आणि 8 हे अनुसूचित जातीचे असल्याने त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप देखील पोलिसांवर करण्यात आला आहे. तसेच जाणीवपूर्वक सार्वजनिक ठिकाणी अपमानित केल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला आहे.या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11 पोलिसांवर गुन्हा

दरम्यान, एका प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना तीन दिवस डांबून ठेवल्याबद्दल आणि दुसऱ्या एका प्रकरणात अल्पवयीन आरोपींना कारच्या बोनेटला बांधून त्यांना मारहाण केल्याबद्दल पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील 11 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य मानवाधिकार आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालकांना पुण्याचे पोलीस आयुक्तांसह तेरा पोलीसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देत स्थगिती मिळवली. त्यामुळे पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांना वगळुन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अकरा पोलीसांवर सी आय डी कडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांचा समावेश आहे. अल्पवयीन मुलांना डांबून ठेवणे, त्यांची धिंड काढणे, त्यांना मारहाण करुन ती वैद्यकीय तपासणीत आढळून येऊ नये यासाठी पुरावे दडवण्याचा प्रयत्न करणे आणि एट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे:

गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) तक्रारदार संकेत सतिश गोसावी यांच्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात FIR No. 0483 / 2026 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

1) मानसिंग पाटील - वरिष्ठ पोलीस निरीक्षक

2) गणेश मोहिते - सपोनि

3) स्नेहल थोरात - सपोनि

4) निलेश मोकाशी - पोनि

5) सुनिल हनवटे - पोहवा

6) दिनेश टापके - पोहवा

7) मितेश चोरमोले - पोलीस अंमलदार

8) सागर बोरसे - पोलीस अंमलदार

9) सोहम रोडेकर - पोलीस अंमलदार

10) मंगेश पवार - पोलीस अंमलदार

11) स्वप्ना भिसे - महिला पोलीस अंमलदार

कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल ?

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS 2023), बाल न्याय कायदा २०१५ (कलम ७४, ७५ - बालकांची ओळख उघड करणे व क्रूर वागणूक) तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (Atrocity Act 1989) अंतर्गत गंभीर कलमे लावली आहेत. दरम्यान, याप्रकरणी, सुनील रामनंद हे तपास अधिकारी म्हणून काम करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >