Thursday, September 24, 2026

FSSAI New Rules : शाळांजवळ जंक फूडच्या विक्रीवर कडक नियम, FSSAIचा नवा मसुदा; जाणून घ्या काय बदलणार

FSSAI New Rules : शाळांजवळ जंक फूडच्या विक्रीवर कडक नियम, FSSAIचा नवा मसुदा; जाणून घ्या काय बदलणार

शाळांमध्ये आणि शाळांच्या 50 मीटर परिसरात जास्त मीठ, साखर आणि फॅट असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध घालण्याच्या नियमांना आता अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून याबाबत नियम अस्तित्वात असले तरी नेमके कोणते खाद्यपदार्थ या नियमांच्या कक्षेत येतील, याबाबत स्पष्ट यादी उपलब्ध नव्हती. आता भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAIने यासंदर्भातील नवीन नियमांचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. ( FSSAI New Rules)

नव्या मसुद्यानुसार, एखादा खाद्यपदार्थ शाळांच्या परिसरात विक्रीसाठी योग्य आहे की नाही, हे त्यातील मीठ, साखर आणि फॅटच्या प्रमाणाच्या आधारे ठरवले जाणार आहे. त्यामुळे चिप्स, बिस्किटे, पॅकेज्ड स्नॅक्स किंवा शीतपेयांसारख्या पदार्थांवर सध्या थेट बंदी घालण्यात आलेली नाही. संबंधित खाद्यपदार्थांमध्ये पोषक घटकांचे प्रमाण किती आहे, यानुसार त्यांच्यावर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या नियमांनुसार शाळेच्या कॅन्टीन, मेस, वसतिगृह तसेच शाळेच्या प्रवेशद्वारापासून 50 मीटरच्या परिसरात जास्त मीठ, साखर आणि फॅट असलेल्या पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध आहेत. याशिवाय मुलांना आकर्षित करणाऱ्या अशा खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवरही नियम लागू आहेत.

FSSAIच्या माहितीनुसार, शाळांसाठी आरोग्यदायी खाद्यपदार्थांची यादी किंवा अनिवार्य मेनू अद्याप अंतिम करण्यात आलेला नाही. नवीन पोषणविषयक मसुदा अंतिम झाल्यानंतर कोणते पदार्थ प्रतिबंधित किंवा नियंत्रित केले जातील, हे स्पष्ट होणार आहे. (Food)

नियम अंतिम झाल्यानंतर शाळेतील कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे. ‘ईट राईट स्कूल’ हा उपक्रम सध्या शाळांसाठी ऐच्छिक आहे. तसेच 50 मीटरच्या नियमाची अंमलबजावणी आणि त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित राज्य सरकारांची असेल.

दरम्यान, हे नियम पूर्णपणे कधी लागू होतील, याची अंतिम मुदत अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे FSSAIचा अंतिम निर्णय आणि त्यानंतर जाहीर होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या यादीकडे पालक, विद्यार्थी आणि शाळांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >