मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि गणेशोत्सवाचा भव्य सोहळा परदेशी पर्यटकांना जवळून पाहता यावा, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाने गिरगाव चौपाटीवर एक विशेष 'व्ह्यूईंग पॅव्हेलियन' (special viewing pavilion) उभारले आहे. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना गणेश विसर्जन सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची नामी संधी मिळणार आहे. महाराष्ट्राचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जगभरातून येणाऱ्या पर्यटकांपर्यंत पोहोचवणे तसेच राज्यामध्ये सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे पर्यटन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. सध्या सुरू असलेल्या १२ दिवसांच्या या गणेशोत्सवाची सांगता २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. या दिवशी मुंबईतील मोठमोठ्या गणपती बाप्पांच्या मिरवणुका निघतील आणि त्यानंतर समुद्र व इतर जलाशयांमध्ये मूर्तींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन केले जाईल.
गिरगाव चौपाटीवर सुरक्षेसह विशेष व्यवस्था
गिरगाव चौपाटीवर तयार करण्यात आलेल्या या खास पॅव्हेलियनमुळे परदेशी पाहुण्यांना कोणत्याही अडथळ्याविना आणि सुरक्षित वातावरणात विसर्जन सोहळा पाहता येईल. या उपक्रमाद्वारे पर्यटकांना केवळ उत्सव पाहायला मिळणार नाही, तर या सणामागचे सांस्कृतिक महत्त्व समजून घेता येईल, असे पर्यटन विभागाने स्पष्ट केले आहे. या मंडपाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोककला आणि संस्कृतीचे विविध पैलू परदेशी पर्यटकांसमोर मांडले जाणार आहेत, ज्यामुळे त्यांना या उत्सवाचा अधिक सखोल अनुभव घेता येईल.
संस्कृतीच्या माध्यमातून पर्यटनाचा विकास : पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
"गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून जनतेला एकत्र आणणारा एक मोठा उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची अनोखी सांस्कृतिक ओळख जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अशा उपक्रमांमुळे राज्यातील सांस्कृतिक पर्यटनाला मोठी गती मिळेल," असा विश्वास पर्यटन मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraje Desai) यांनी व्यक्त केला.
इतिहास आणि अध्यात्माची माहिती मिळणार : संजय खंदारे
पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय खंदारे म्हणाले की, "गिरगाव चौपाटीवरील या व्यवस्थेमुळे परदेशी पर्यटकांना स्थानिक परंपरांचा थेट अनुभव घेता येईल. या पॅव्हेलियनच्या माध्यमातून त्यांना गणेशोत्सवाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगितले जाईल. असे प्रयत्न महाराष्ट्राचा वारसा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे मांडण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील." मुंबईतील विसर्जन सोहळ्यासाठी गिरगाव चौपाटी हे सर्वात प्रमुख आणि ऐतिहासिक ठिकाण मानले जाते. या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक जमतात, त्यामुळेच परदेशी पर्यकांसाठी ही जागा निवडण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे आदरातिथ्य जगासमोर येणार : विकास पानसरे
पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांनी सांगितले की, "या विशेष व्यवस्थेमुळे परदेशी पाहुण्यांना गणेशोत्सवाच्या विविध पैलूंची माहिती मिळेल आणि प्रत्यक्ष विसर्जन सोहळा डोळ्यांत साठवता येईल. यातून महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, येथील आदरातिथ्य आणि सांस्कृतिक पर्यटनाच्या अफाट संधी जगासमोर येतील." पर्यटन विभागाच्या मते, अशा मोठ्या सांस्कृतिक उत्सवांचा वापर करून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना महाराष्ट्राशी जोडणे आणि राज्याला एक प्रमुख 'सांस्कृतिक पर्यटन केंद्र' म्हणून विकसित करणे हा यामागचा मूळ हेतू आहे.
२५ सप्टेंबरला होणार गणेशोत्सवाची सांगता
१२ दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाल्यानंतर या गणेशोत्सवाची २५ सप्टेंबर रोजी सांगता होणार आहे. या दिवशी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध समुद्रकिनारे, तलाव आणि कृत्रिम तलावांमध्ये बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन केले जाईल. अंतिम दिवशी मुंबईत ढोल-ताशांच्या गजरात आणि अलोट गर्दीत भव्य विसर्जन मिरवणुका निघतील. या संपूर्ण सोहळ्याचा आनंद परदेशी पर्यटकांना शिस्तबद्ध आणि व्यवस्थित वातावरणात घेता यावा, यासाठीच पर्यटन विभागाने हे विशेष पाऊल उचलले आहे.






