Thursday, September 24, 2026

Palghar Wall Collapse : वाड्यात कारखान्याची भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू; 2 महिलांसह एका पुरुषाचा समावेश

Palghar Wall Collapse : वाड्यात कारखान्याची भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू; 2 महिलांसह एका पुरुषाचा समावेश

पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कारखान्यातील भिंत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पाली पोशेरी परिसरातील टीना रबर कारखान्यात ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या घटनेमुळे कारखाना परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Palghar Wall Collapse)

मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यात काम सुरू असताना अचानक भिंत कोसळली. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली कामगार अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत केशव गुणगुणा, रंजना कोंब आणि मीरा गवळी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच वाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेची पाहणी करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. भिंत नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, तसेच कारखान्यात कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याचा तपास केला जात आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

या घटनेमुळे पालघर जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक असते. मात्र, अशा दुर्घटनांमुळे प्रत्यक्षात या नियमांची अंमलबजावणी कितपत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बार्शीतील घटना

दरम्यान, बार्शी तालुक्यातील वैराग येथेही दोन दिवसांपूर्वी भिंत कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला होता. खेंदाड गल्ली परिसरात पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. मीनल गुलाब ठोंबरे आणि त्यांच्या मावशी सुमन महादेव पारदे या दोघी एका खोलीत झोपल्या असताना अचानक घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली.

दोघींना ढिगाऱ्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी बार्शीकडे नेत असताना दोघींचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेनंतर वैराग परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात आली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >