Thursday, September 24, 2026

Pune Metro : पुणेकरांची मेट्रोची प्रतीक्षा वाढली; हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटने पुन्हा लांबणीवर

Pune Metro : पुणेकरांची मेट्रोची प्रतीक्षा वाढली; हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटने पुन्हा लांबणीवर

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो मार्गिका-3 संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या बहुप्रतीक्षित मेट्रो मार्गिकेची प्रवासी सेवा पुन्हा लांबणीवर पडली आहे.

नेमकं काय कारण ?

मेट्रोच्या उद्घाटनासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असली तरी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे. (Pune News)

या मेट्रो मार्गिकेला कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी म्हणजेच CMRS ची आवश्यक मंजुरी जुलै महिन्यात मिळाली होती. त्यामुळे मेट्रो सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता होती. मात्र, उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ निश्चित होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच उद्घाटन होण्याची शक्यता आहे. (Pune Metro)

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच PMRDA कडून या मेट्रो मार्गिकेचे काम करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील 12 स्थानके प्रवासी सेवेसाठी सज्ज आहेत. उद्घाटनाला विलंब होत असल्याने या कालावधीचा उपयोग उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (PMRDA)

उर्वरित 5 स्थानकांचे कामही वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर पहिल्या टप्प्यातील 12 स्थानकांसह एकूण 17 स्थानके एकाच वेळी प्रवाशांसाठी खुली करण्याची तयारी सुरू आहे. (Hinjewadi Metro)

हिंजवडी ते शिवाजीनगर ही संपूर्ण मेट्रो मार्गिका 23 स्थानकांची आहे. ही मार्गिका पुणे शहरातील सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्गांशी जोडली जाणार आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्क, बाणेर, बालेवाडी, औंध आणि शिवाजीनगर परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. मात्र, उद्घाटन पुढे ढकलल्याने मेट्रो सुरू होण्याची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >