ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडामध्ये यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग लागून 9 प्रवाशांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री जेवर परिसरातील दयानतपूर गावाजवळ ही घटना घडली. बिहार पासिंगची ही बस नोएडाहून महोबाकडे जात होती. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 35 प्रवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गाढ झोपेत असताना बसला अचानक लागली आग
पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बसला अचानक आग लागली. यमुना एक्सप्रेसवेवर बस पोहोचल्यानंतर काही प्रवाशांना जळल्यासारखा वास आला. त्यांनी चालकाला बस थांबवण्यास सांगितले. मात्र, बस थांबवण्यापूर्वीच आगीने मोठे रूप घेतले आणि काही वेळातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
बचत गटांना २५ हजार खेळत भांडवल देण्यासाठी साडेपाच कोटींचा निधी मंजूर स्थायी समितीत प्रस्तावाला मिळाली मान्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्य व ...
आगीमुळे बसमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. काही प्रवाशांनी खिडक्या आणि दरवाजातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, 9 प्रवाशांना बसमधून बाहेर पडता आले नाही. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. या घटनेत त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत बसला आगीने पूर्णपणे वेढले होते. दरम्यान, बसचा चालक आणि वाहक घटनास्थळावरून फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचा शोध सुरू आहे.
आगीतून सुखरूप बाहेर पडलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, तो बसमध्ये झोपला होता. अचानक बसला आग लागल्याचे सांगून त्याला उठवण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवासी बाहेर पडण्यासाठी धडपड करू लागले. बसमध्ये मोठ्या प्रमाणात धूर असल्याने बाहेर पडणे कठीण झाले होते.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेत मृतांच्या कुटुंबीयांप्रति दुःख व्यक्त केले. तसेच जखमींना योग्य उपचार मिळावेत आणि पीडित कुटुंबीयांना आवश्यक ती मदत मिळावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.






