
Thane News: दिवाळीच्या रात्री ठाण्यातील रहेजा गार्डन परिसरातील रहेजा कार्लाइन या 17 मजली इमारतीला भीषण आग लागली. इमारतीच्या 8 व्या मजल्यावरील एका घरात लागलेली आग पसरत 14 व्या मजल्यापर्यंत पोहोचली. या घटनेमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (TDRF) जवानांनी केलेल्या बचावकार्यामुळे 50 रहिवाशांसह त्यांच्या पाळीव प्राण्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
View this post on Instagram
8 व्या मजल्यावर लागलेली आग 14 व्या मजल्यापर्यंत पसरली
8 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 8:30 वाजता इमारतीच्या 8 व्या मजल्यावरील एका घरात आग लागली. काही वेळातच आगीचा विस्तार होऊन ती 14 व्या मजल्यापर्यंत पोहोचली. घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल आणि TDRF पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने इमारतीतील लिफ्टचा वापर करणे शक्य नव्हते. त्यामुळे काही रहिवाशांना रिफ्युजी एरियामध्ये, तर इतरांना गच्चीवर थांबण्यास सांगण्यात आले. अग्निशमन दलाने शिड्या आणि स्ट्रेचरच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. या बचावकार्यात रहिवाशांच्या कुत्रे आणि मांजरांसारख्या पाळीव प्राण्यांचीही सुटका करण्यात आली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल
आगीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के आणि आमदार रवींद्र फाटक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अग्निशमन दलाने काही तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.
या बचावकार्यात अत्याधुनिक ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. ड्रोनच्या मदतीने रहिवासी नेमक्या कोणत्या मजल्यावर अडकले आहेत, याचा शोध घेणे शक्य झाले. वेळीच मदत मिळाल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचेही त्यांनी नमूद केले.
ठाणे जिल्ह्यात हवेत उडणारे फटाके आणि रॉकेट्सवर बंदी
दरम्यान, ठाणे शहर आणि जिल्ह्यात दिवाळीच्या काळात विविध ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. यामागील संभाव्य कारणांमध्ये हवेत उडणारे फटाके आणि रॉकेट्सचाही समावेश असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात हवेत उडणारे फटाके आणि रॉकेट्स उडवण्यास मनाई करणारे आदेश जारी केले आहेत.
हे आदेश 8 नोव्हेंबरपासून पुढील 3 महिन्यांसाठी लागू राहणार आहेत. मोठ्या इमारतींचा परिसर, पार्किंग आणि मोकळ्या जागांमध्ये हवेत उडणारे फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, समूह किंवा संस्थेविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासनाला देण्यात आली आहे.






