Friday, September 25, 2026

Mumbai Ganeshotsav : मुंबईत गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; 25 हजार कर्मचारी तैनात, 383 कृत्रिम तलावांची व्यवस्था

Mumbai Ganeshotsav : मुंबईत गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; 25 हजार कर्मचारी तैनात, 383 कृत्रिम तलावांची व्यवस्था

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेश विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठी तयारी केली आहे. विसर्जन सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी पालिकेचे 25 हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मुंबईत 67 नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि 278 ठिकाणी 383 हून अधिक कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

विसर्जन स्थळांवर 1,194 स्टील प्लेट, 23 जर्मन तराफे, 34 क्रेन, 85 रुग्णवाहिका आणि 10 मोटरबोट सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी 1,132 जीवरक्षक तैनात करण्यात आले असून, 6,052 फ्लडलाईट आणि सर्चलाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. निर्माल्य संकलनासाठी 498 निर्माल्य कलश आणि 326 निर्माल्य डंपर उपलब्ध करण्यात आले आहेत.

गर्दीचे व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी 261 स्वागत कक्ष, 228 नियंत्रण कक्ष आणि 75 निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुविधेसाठी 489 तात्पुरती प्रसाधनगृहेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 6 फूट उंचीपर्यंतच्या गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जन मार्ग सुरक्षित करण्यासाठी पालिकेने 506 रस्त्यांवरील 4,279 खड्डे आणि 171 ड्रेनेज कव्हर्सची दुरुस्ती केली आहे. तसेच मार्गातील 281 ठिकाणच्या अडथळा ठरणाऱ्या केबल्स हटवण्यात आल्या असून 515 ठिकाणी वृक्षछाटणी करण्यात आली आहे.

गिरगाव चौपाटीवर विशेष व्यवस्था

गिरगाव चौपाटीवरील स्वराज्यभूमी येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. येथे 12 कृत्रिम तलाव, 20 निरीक्षण मनोरे, 22 तराफे, 90 प्रसाधनगृहे आणि 2,000 मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र, 3 रुग्णवाहिका, 548 फ्लडलाईट आणि 11 सर्चलाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी मूर्तिकारांना 940 मेट्रिक टनांहून अधिक शाडू माती आणि 25,400 लिटर पर्यावरणपूरक रंग विनामूल्य देण्यात आले आहेत. तसेच ‘एक गणपती, एक झाड’ उपक्रमातून विसर्जित होणाऱ्या मूर्तींच्या संख्येइतकी झाडे लावण्याचा उपक्रम राबवला जात आहे.

दरम्यान, समुद्रकिनारी ब्ल्यू बटन जेलीफिश आणि स्टिंग रेचा वावर लक्षात घेता नागरिकांनी समुद्रात उतरताना काळजी घ्यावी आणि पालिका व पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात आतापर्यंत 1 लाख 63 हजार 386 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आहे. यामध्ये दीड दिवसाच्या उत्सवातील 63 हजार 312, पाच दिवसांच्या उत्सवातील 36 हजार 992, सहा दिवसांच्या उत्सवातील 44 हजार 261 आणि सात दिवसांच्या उत्सवातील 18 हजार 821 मूर्तींचा समावेश आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >