मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी लाडक्या बाप्पाला पर्यावरणपूरक पद्धतीने निरोप देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी विसर्जन प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. "निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी..." या आर्त ओळी त्यांनी या निमित्ताने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. विसर्जनापूर्वी बाप्पाची पारंपरिक पद्धतीने उत्तरपूजा करण्यात आली. त्यानंतर 'वर्षा'च्या आवारातच घरच्या घरी कृत्रिम तलावात बाप्पाचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. पत्नी अमृता फडणवीस, कुटुंबातील इतर सदस्य आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून बाप्पाच्या भक्तीत रमलेले मन आज निरोपाच्या क्षणी भरून आले. पण बाप्पाचे विसर्जन म्हणजे वियोग नाही, तर नव्या आशा, नव्या संकल्पांसह पुढे जाण्याचा एक नवा आरंभ आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या. बाप्पाची कृपा आणि आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर राहोत, जनतेच्या जीवनातील सर्व चिंता-विघ्ने दूर होवोत, अशी मनोभावे प्रार्थना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत अनेक दिग्गज नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी 'वर्षा' निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट देऊन बाप्पाची आरती केली होती.निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी...🌺
आज वर्षा निवासस्थानी कुटुंबीयांसोबत लाडक्या गणरायाचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. गेल्या काही दिवसांपासून बाप्पाच्या भक्तीत रमलेले मन आज निरोपाच्या क्षणी भरून आले. पण बाप्पाचे विसर्जन म्हणजे वियोग… pic.twitter.com/ra6wrV8XqL — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 25, 2026






