मुंबई फटाक्यांनी पेटतेय! एकाच दिवसांमध्ये फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या १३७ घटना
मुंबई अग्निशमन दलाने या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित अंतर राखून फटाके फोडण्याचे आवाहन केले असून आपत्कालीन मदतीसाठी १०१ आणि १९१६ हे क्रमांक जारी केले आहेत.
November 10, 2026 11:16 AM
मुंबई फटाक्यांनी पेटतेय! एकाच दिवसांमध्ये फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या १३७ घटना (Photo: AI)
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईत फटाक्यांच्या आतषबाजीवर न्यायालयाने निर्बंध घातलेले असताना त्यानुसार महापालिका प्रशासनाच्यावतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, या जनजागृतीमध्ये लोकप्रतिनिधींकडूनच खो घातल्याने यंदाच्या दिवाळीमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीचे प्रमाण वाढलेले असून यामुळे मोठ्याप्रमाणात आगी लागण्याच्या घटनाही फटाक्यांमुळेच लागल्याची बाब समोर आली आहे.
मुंबई अग्निशमनदलाच्यावतीने प्राप्त आकडेवारीनुसार, दिवाळीच्या कालावधीतील मागील दोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, मागील २४ तासांमध्ये मुंबईत एकूण १४२ आगी लागण्याच्या घटना घडल्या असून त्यातील १३७ दुर्घटना या फटाक्यांमुळेच घडल्याचे दिसून आले आहे. यंदा ८ नोव्हेंबर २०२६ रोजी एकाच दिवसात आगीच्या एकूण १४२ घटनांची नोंद झाली असून, त्यापैकी तब्बल १३७ घटना फटाक्यांमुळे घडल्या आहेत. या घटनांमध्ये दोन महिला जखमी झाल्या आहे. तर सन २०२४ मध्ये मुंबईत आगीच्या एकूण २६२ घटनांची नोंद झाली होती. त्यापैकी ८० घटना फटाक्यांमुळे घडल्या होत्या. या घटनांमध्ये ३ जण जखमी झाले होते. सन २०२५ मध्ये आगीच्या घटनांची संख्या २८९ वर पोहोचली होती. त्यापैकी ११३ घटना फटाक्यांमुळे घडल्या होत्या. या वर्षी कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची नोंद नव्हती.
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या विधी खात्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात असून महापालिका प्रशासनाने या खात्यांतील पदांमध्ये ...
मुंबई शहर व उपनगरांमध्ये गेल्या २४ तासांत फटाक्यांमुळे १३७ पेक्षा अधिक आगीच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी फटाके फोडताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. तसेच आग लागल्यास किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मुंबई अग्निशमन दलाच्या १०१ या क्रमांकावर तसेच ९०७६३३३१०१, ९०७६३३३१०२, ९०७६३३३१०३, ९०७६३३३१०४ आणि ९०७६३३३१०५ वर मुंबई अग्निशमन दलाशी संपर्क साधावा. किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
फटाके फोडताना कशी घेणार काळजी
फटाके नेहमी मोकळ्या जागेत आणि सुरक्षित अंतर राखून फोडावेत.
इमारती, झोपड्या, दुकाने, वाहनतळ, पेट्रोल पंप, विद्युत रोहित्रे व विद्युत तारांजवळ फटाके फोडू नयेत.
फटाके फोडताना जवळ पाण्याची बादली किंवा अग्निशामक यंत्र उपलब्ध ठेवावे.
लहान मुलांनी फटाके फोडताना पालकांनी त्यांच्यासोबत उपस्थित राहून देखरेख करावी.
हातात धरून फटाके फोडू नयेत. रॉकेट किंवा उडणारे फटाके इमारतींच्या दिशेने सोडू नयेत.
जळलेले किंवा न फुटलेले फटाके पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये.
गच्ची, बाल्कनी, खिडक्या तसेच घराच्या परिसरात ज्वलनशील वस्तू, कागद, कापड व इतर साहित्य साठवून ठेवू नये.
फटाक्यांमुळे आग लागल्यास घाबरून न जाता त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे आणि अग्निशमन दलाला कळवावे.
आग लागल्यास किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मुंबई अग्निशमन दलाच्या १०१ या क्रमांकावर किंवा मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाने केले.