Saturday, September 26, 2026

Noida Bus Fire : ‘आई खाली उतरेपर्यंत मी बाहेर पडणार नाही’, शशांकने अखेरपर्यंत सोडली नाही आईची साथ; नोएडा बस दुर्घटनेतील शशांकची हृदयद्रावक कहाणी

Noida Bus Fire : ‘आई खाली उतरेपर्यंत मी बाहेर पडणार नाही’, शशांकने अखेरपर्यंत सोडली नाही आईची साथ; नोएडा बस दुर्घटनेतील शशांकची हृदयद्रावक कहाणी

Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर जेवरजवळ बुधवारी रात्री खासगी एसी स्लीपर बसला भीषण आग लागून 9 प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत गुरुग्राममध्ये इंडिगो एअरलाइन्समध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेला 28 वर्षीय शशांक गुप्ता आणि त्याची 47 वर्षीय आई सुनीता गुप्ता यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, मृत्यू समोर दिसत असतानाही शशांकने आईची साथ सोडली नाही, अशी हृदयद्रावक माहिती समोर आली आहे.

महोबा जिल्ह्यातील चरखारी येथील रहिवासी असलेल्या सुनीता गुप्ता या गुडघ्यांच्या त्रासावर उपचार घेण्यासाठी गेल्या महिनाभरापासून मुलगा शशांककडे राहत होत्या. दरम्यान, महोबा जिल्ह्यातील चरखारी येथील भाजप नेते असलेले शशांकचे वडील नीरज गुप्ता यांच्या भावाला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाल्यानंतर मायलेकाने तातडीने महोबाला जाण्याचा निर्णय घेतला. रेल्वेचे तिकीट उपलब्ध न झाल्याने त्यांनी दिल्लीतील काश्मीरी गेटहून महोबाकडे जाणाऱ्या ‘राज कल्पना ट्रॅव्हल्स’च्या बसमध्ये मागील बाजूस स्लीपर सीट बुक केली होती.

...अन् काही मिनिटांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर

प्रवासादरम्यान चालकाच्या केबिनजवळ धूर निघू लागल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, चालक आणि वाहकाने सुरुवातीला या धुराकडे दुर्लक्ष केले. काही मिनिटांतच आगीने मोठे रूप धारण केले आणि बसमध्ये एकच गोंधळ उडाला. आगीपासून बचाव करण्यासाठी काही प्रवाशांनी बसच्या खिडक्या फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी 26 प्रवासी वेळेत बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले.

‘आई खाली उतरेपर्यंत मी बाहेर पडणार नाही’

सुनीता गुप्ता यांना गुडघ्यांचा त्रास असल्याने त्यांना वेगाने बाहेर पडणे शक्य होत नव्हते. यावेळी शशांकला एकट्याने बाहेर पडण्यास सांगण्यात आल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. मात्र, शशांकने आईला सोडून बाहेर जाण्यास नकार दिला. ‘माझी आई बसमधून खाली उतरल्याशिवाय मी स्वतः बाहेर पडणार नाही,’ अशी त्याची भूमिका होती. धुराचे लोट वाढत असतानाही शशांक आईला दरवाजाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत राहिला. मात्र, अखेर दोघांचाही गुदमरून मृत्यू झाला.

अंगठी आणि उंचीवरून पटली ओळख

आगीची तीव्रता इतकी होती की मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले. शवविच्छेदनानंतर सुनीता गुप्ता यांची ओळख त्यांच्या उंचीवरून, तर शशांकची ओळख त्याच्या बोटातील विशेष अंगठीवरून पटल्याची माहिती समोर आली. पत्नी आणि मुलाचे पार्थिव पाहताना शशांकचे वडील नीरज गुप्ता यांना अश्रू अनावर झाले. मुलाने शेवटच्या क्षणापर्यंत आईची साथ सोडली नसल्याचे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला.

9 प्रवाशांचा मृत्यू, 26 जण बचावले

या दुर्घटनेत बसमधील 35 प्रवाशांपैकी 26 जण बचावले, तर 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मध्य प्रदेश, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील प्रवाशांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. बसच्या वातानुकूलित यंत्रणेसह एलईडी लाईट्सच्या वायरिंगवर अतिरिक्त ताण आल्याने शॉर्ट सर्किट झाले असावे, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शशांकचे पार्थिव त्याच्या मूळ गावी चरखारी येथे नेण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, आईला शेवटपर्यंत सोबत ठेवण्याचा त्याचा प्रयत्न अनेकांच्या मनाला चटका लावून गेला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >