Sunday, September 27, 2026

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू, एक गंभीर

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू, एक गंभीर

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाट परिसरात शनिवारी दुपारी तीन वाहनांचा अपघात झाला. दोन आयशर टेम्पो आणि एका कंटेनरचा या अपघातात समावेश आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे काही काळ मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिली धडक बोरघाटातील ढेकू गावाच्या हद्दीत झाली. कोल्हापूरमधील कुंभोज येथील 36 वर्षीय संदीप कोळी हे आयशर टेम्पो क्रमांक KA 52 B 5089 घेऊन कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जात होते. त्यांच्या वाहनातून फेविकॉलसारखे रसायन नेले जात होते. तीव्र उतारावर वाहन पोहोचले असता टेम्पोवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या टेम्पोने पुढे जाणाऱ्या दुसऱ्या आयशर टेम्पोला धडक दिली.

पहिल्या धडकेनंतर दुसरा आयशर टेम्पो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन आदळला. दुसऱ्या टेम्पोचा क्रमांक MH 51 C 7533, तर कंटेनरचा क्रमांक NL 01 Q 1264 असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात दोन्ही टेम्पो चालकांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली.

घटनेची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, आयआयबी पथक आणि हेल्प फाउंडेशनचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघातातील पहिल्या टेम्पोमधील रसायन रस्त्यावर सांडल्याने खबरदारी म्हणून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ थांबवण्यात आली. दुसऱ्या टेम्पोमध्ये पुठ्ठे, तर कंटेनरमध्ये होंडा कंपनीच्या गाड्या असल्याची माहिती समोर आली आहे. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आली. त्यानंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >