Friday, November 13, 2026

दिवाळीच्या सुट्टीत चोरट्यांचा डल्ला! बंद घराची खिडकी तोडून चोरांनी लांबवले सोन्याचे दागिने

मुंबईतील चुनाभट्टी परिसरात दिवाळीनिमित्त गावी गेलेल्या एका कुटुंबाच्या बंद घराचा ताबा घेत अज्ञात चोराने खिडकीची ग्रील तोडून 96 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. कुटुंब परत आल्यावर हा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मुंबई: दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर गावी जात असतात. याचाच फायदा घेत, मुंबईतील चुनाभट्टीमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त गावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. दिवाळी सणाच्या सुट्ट्यांसाठी गावी गेलेल्या एका कुटुंबाच्या बंद घराचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मुंबईतील चुनाभट्टी (Chunabhatti) परिसरात घडली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून चोरांचा शोध घेतला जात आहे.

नेमकी घटना कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय शांतबाई कदम पती आणि १७ वर्षांच्या मुलीसह चुनाभट्टी येथील हिल रोडवरील वीरवली सोसायटीजवळ असलेल्या फातिमा बी चाळीत मार्च 2026 पासून भाड्याने राहत आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी हे कुटुंब 7 नोव्हेंबर रोजी सकाळी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील इंदगाव या आपल्या मूळ गावी गेले होते. गावी निघण्यापूर्वी शांतबाई यांनी घरातील लाकडी कपाटाच्या कप्प्यात, साड्यांच्या खाली दोन सोन्याच्या बाळ्या, एक नथ आणि दोन वाट्यांचे सोन्याचे मंगळसूत्र काळजीपूर्वक ठेवले होते.

घरी परतल्यावर बसला धक्का

दिवाळीची सुट्टी संपवून हे कुटुंब 13 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी परतले. घरी पोहोचल्यानंतर शांतबाई यांना घराच्या खिडकीला बसवलेली लोखंडी ग्रील काढून खाली जमिनीवर पडलेली दिसली. त्यांनी तातडीने मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून आत प्रवेश केला, तेव्हा घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ धाव घेऊन कपाटाची पाहणी केली असता, कपाटात ठेवलेले सोन्याचे मौल्यवान दागिने गायब असल्याचे समजले. चोराने बंद घराची खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

96 हजारांचा मुद्देमाल लंपास

चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये तब्बल पाच ग्रॅम वजनाचे आणि अंदाजे 40,000 रुपये किंमतीचे दोन वाट्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, सहा ग्रॅम वजनाचे आणि 48,000 रुपये किंमतीची सोन्याच्या कानातील कुड्यांची जोडी आणि 8000 रुपये किंमतीची एक ग्रॅमची सोन्याची नथ यांचा समावेश आहे. या सर्व चोरी गेलेल्या दागिन्यांची किंमत सध्याच्या घडीला 96,000 रुपये इतकी असल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शांतबाई कदम यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे चुनाभट्टी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर (FIR) नोंदवला आहे. सणवाराच्या दिवसांत घर बंद करून बाहेर जाणाऱ्या नागरिकांसाठी ही घटना एक धोक्याची घंटा ठरली असून, पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा कसून शोध घेत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >