Sunday, September 27, 2026

Kanyakumari Theft : एका रीलने खेळ खल्लास! YouTuber दाम्पत्याची 'ती' चूक अन् चोरट्यांनी मारला घरात डल्ला; पोलिसही चक्रावले

Kanyakumari Theft : एका रीलने खेळ खल्लास! YouTuber दाम्पत्याची 'ती' चूक अन् चोरट्यांनी मारला घरात डल्ला; पोलिसही चक्रावले

तामिळनाडू : सोशल मीडियावर आपली जीवनशैली आणि घरातील गोष्टी शेअर करणे आता अनेकांसाठी रोजच्या आयुष्याचा भाग बनला आहे. मात्र, याच सोशल मीडिया पोस्टमधून चोरांना घराची माहिती मिळू शकते का, असा प्रश्न तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे घडलेल्या चोरीच्या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. नागरकोविलजवळील थम्मथुकोनम येथील व्हीआयपी गार्डन परिसरात राहणाऱ्या एका यूट्यूबर दाम्पत्याच्या घरात चोरी झाली आहे.

मधुमिता आणि तिचे पती विनोद कुमार हे यूट्यूब तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घराच्या मागील बाजूने प्रवेश केला. घराचा मागचा दरवाजा तोडून आत शिरल्यानंतर चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. चोरी केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच राजाक्कमंगलम पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची तसेच आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात करण्यात आली आहे. चोरट्यांनी घरात प्रवेश करण्यासाठी कोणता मार्ग वापरला, याचाही शोध घेतला जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, घरातून सुमारे 118 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय घरातील रोकडही चोरट्यांनी नेल्याचे समोर आले आहे. मधुमिता आणि विनोद कुमार सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ शेअर करतात. त्यांच्या काही पोस्ट आणि व्हिडिओमध्ये सोन्याचे दागिने तसेच आलिशान जीवनशैलीशी संबंधित गोष्टी दिसून येतात.

त्यामुळे या सोशल मीडिया कंटेंटमधून घरातील मौल्यवान वस्तूंबाबत कोणाला माहिती मिळाली होती का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. घरात मोठ्या प्रमाणात सोने असल्याची माहिती कोणाला होती, याचाही शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >