Nashik : गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांऐवजी डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या अतिआवाजाला प्राधान्य देणाऱ्या गणेश मंडळांवर नाशिक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण 36 गणेश मंडळे, पदाधिकारी आणि डीजे ऑपरेटरविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्रातील भद्रकाली, पंचवटी आणि मुंबईनाका हद्दीतील 29 मंडळांवर, तर देवळाली कॅम्प, उपनगर, नाशिक रोड आणि अंबड परिसरातील सात मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित मंडळांचे प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
रील्समुळे डीजेच्या आवाजाची स्पर्धा ?
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत कारवाई होण्यामागे सोशल मीडिया आणि विशेषतः इन्स्टाग्राम रील्सची भूमिका असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. विसर्जन मिरवणूक शुक्रवारी, 25 सप्टेंबर रोजी होती. त्यापूर्वी बुधवारपासूनच काही गणेश मंडळांनी त्यांच्या डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या आवाजाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगण्यात येते. हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर मिरवणुकीदरम्यान कोणत्या मंडळाचा डीजे सर्वाधिक मोठा आवाज करतो, यावरून रील्स तयार करण्याची स्पर्धा सुरू झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनीप्रदूषणाची समस्या अधिक तीव्र झाल्याचे पोलिसांनी नोंदवले.
मुंबई : आयआयटी बॉम्बेमधील (IIT Bombay) विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणात क्राइम ब्रांचच्या तपासादरम्यान एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर ...
पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई
नाशिकमध्ये काही वर्षांनंतर पुन्हा साऊंड सिस्टीमला परवानगी देण्यात आली होती. मात्र, परवानगीच्या अटी आणि ध्वनीमर्यादांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली.पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानंतर भद्रकाली आणि सरकारवाडा पोलिसांच्या विशेष पथकांनी अतिआवाजाची नोंद घेत पंचनामे केले.या कारवाईचा अहवाल वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश चौधरी आणि युवराज पतकी यांनी सहाय्यक आयुक्त प्रमोद वाघ यांच्या माध्यमातून उपायुक्त मोनिका राऊत यांच्याकडे सादर केल्याचे सांगण्यात आले आहे.
अहवालाच्या आधारे संबंधित गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि डीजे ऑपरेटरविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुख्य विसर्जन मिरवणुकीसोबतच शहरातील उपनगरांमध्येही ध्वनीमर्यादा उल्लंघनाविरोधात कारवाई सुरू आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या गणेश मंडळांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कारवाईच्या अधिकृत यादीवरून प्रश्नचिन्ह
दरम्यान, पोलिसांनी 36 मंडळांवर कारवाई केल्याचे सांगितले जात असले तरी, रविवारी रात्रीपर्यंत या सर्व मंडळांची अधिकृत यादी सार्वजनिक करण्यात आली नसल्याचा मुद्दाही समोर आला आहे. स्थानिक पोलिस ठाण्यांकडून अहवाल प्राप्त होत असून, नियमांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका पोलिसांकडून सांगण्यात आली आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या मंडळांवर कारवाई झाली, कोणत्या नियमांखाली गुन्हे दाखल झाले आणि जप्तीची प्रक्रिया कशी राबवली जाणार, याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे.