Monday, September 28, 2026

Ujjain Shahi Masjid Tension : उज्जैनमध्ये शाही मशिदीचा भाग हटवण्यावरून तणाव; रस्ता रुंदीकरणादरम्यान दगडफेक आणि अश्रूधुराचा वापर

Ujjain Shahi Masjid Tension : उज्जैनमध्ये शाही मशिदीचा भाग हटवण्यावरून तणाव; रस्ता रुंदीकरणादरम्यान दगडफेक आणि अश्रूधुराचा वापर

उज्जैन : उज्जैनमधील गोपाळ मंदिर (Ujjain Gopal Mandir) आणि छत्री चौक परिसरात प्रस्तावित रस्ता रुंदीकरणासाठी शाही मशिदीचा (Shahi Mashid) काही भाग हटवताना सोमवारी सकाळी अचानक तणाव निर्माण झाला. काम सुरू असतानाच काही अज्ञातांनी अचानक दगडफेक सुरू केल्याने परिस्थिती बिघडली. गर्दीला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या. रस्ता रुंदीकरणात मशिदीचा अडथळा ठरणारा भाग हटवण्याबाबत मशीद समिती आणि जिल्हा प्रशासन यांच्यात आधीच परस्पर सहमती झाली होती. या करारानुसार, मशीद समितीचे सदस्य स्वतःच पोलिसांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तो भाग हटवण्याचे काम करत होते. मात्र, काम सुरू असताना अचानक दगडफेक सुरू झाल्याने परिसरात गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दगडफेक करणाऱ्या गर्दीवर अश्रूधूर सोडला आणि परिस्थिती आटोक्यात आणली. मशिदीचा भाग हटवण्याचे काम पाहाण्यासाठी घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते.

महिलांचे रस्ता रोको आंदोलन; महिला पोलीस अधिकारी जखमी

तणावाच्या वातावरणात काही महिला आंदोलकांनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी या महिलांना रस्त्यावरून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केले. या कारवाई दरम्यान उज्जैन क्राईम ब्रांचच्या पोलीस स्टेशन प्रभारी (इन्स्पेक्टर) पुष्पा पांचाळ यांच्या हाताला दुखापत झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन करणाऱ्या महिला पुढे सरकत असताना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी महिला पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. महिलांना सुरक्षितपणे हटवत असताना त्यांनी एका चादरीचा आसरा घेतला होता. याच प्रक्रियेत चादरीच्या धारदार कडेमुळे इन्स्पेक्टर पांचाळ यांच्या हाताला कापले गेले. त्यांच्यावर तातडीने प्रथमोपचार करून पट्टी बांधण्यात आली. या घटनेत कोणत्याही आंदोलक महिलेला दुखापत झालेली नसून सर्व महिला सुरक्षित असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. याबाबत बोलताना इन्स्पेक्टर पुष्पा पांचाळ म्हणाल्या, "महिला आंदोलकांना हटवत असताना त्यांनी पांघरलेल्या चादरीच्या कडेमुळे माझ्या हाताला कापले गेले. यात कोणतीही महिला जखमी झालेली नाही, सर्व सुरक्षित आहेत. माझ्यावर प्रथमोपचार करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी असून या कर्तव्याचाच हा एक भाग आहे."

२०२८ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ता रुंदीकरण

२०२८ मध्ये उज्जैन येथे होणाऱ्या भव्य 'सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. याच प्रकल्पाअंतर्गत कंठाल चौक ते गोपाळ मंदिर या ९०० मीटरच्या रस्त्याची रुंदी १५ मीटर केली जात आहे. या रस्त्याच्या टप्प्यात येणारी सर्व अतिक्रमणे आणि बांधकामे हटवली जात आहेत. शाही मशिदीचा काही भागही या रस्त्याच्या रुंदीकरणात येत असल्याने तो हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती. दरम्यान, मशिदीचा भाग हटवण्याच्या या कारवाईविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सोमवारी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात सुनावणी देखील होणार आहे.

शाही मशिदीला १०० वर्षांहून अधिक इतिहास

उज्जैनची शाही मशीद ही १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. मशीद व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्च १९२५ रोजीच्या सिंधिया राजघराण्याच्या काळातील एका दस्तऐवजात असा उल्लेख आहे की, जमीन अधिग्रहण केल्यानंतर मशिदीचा उर्वरित भाग सुरक्षित ठेवण्यात यावा. याशिवाय, मशीद समितीने १९७५ मध्येही रस्ता आणि वाहतुकीच्या कारणांसाठी आपल्या जागेचा काही भाग दिला होता असा दावा केला आहे. तसेच १३ सप्टेंबर १९८५ च्या मध्य प्रदेश शासनाच्या अधिकृत गॅझेट (राजपत्र) मध्ये मशिदीची नोंद आणि तिच्या मोजणीचा सविस्तर उल्लेख असल्याचे मशीद व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >