Monday, September 28, 2026

Asian Games 2026 : "इथे गटाराचा दुर्गंध येतोय...": जपानमधील आशियाई खेळांच्या ढिसाळ व्यवस्थापनावर मनू भाकरच्या वडिलांचा संताप!

Asian Games 2026 :

नागोया : ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणाऱ्या भारताची स्टार नेमबाज मनू भाकर (Manu Bhakar) हिचे वडील रामकिशन भाकर (ramkishan Bhakar) यांनी जपानमधील आयची-नागोया (Aichi Prefecture and Nagoya) येथे सुरू असलेल्या आशियाई खेळांच्या (Asian Games 2026) आयोजनावर अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी भारतीय पिस्तूल नेमबाजांची निराशाजनक कामगिरी सुरूच राहिल्यानंतर, त्यांनी शूटिंग रेंजवरील परिस्थिती, प्रवासाची वेळ आणि दूरचे अंतर यावर थेट प्रश्न उपस्थित केले.

पेरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर आयची-नागोया येथील आशियाई खेळात मनू भाकरकडून सुवर्णपदकाची मोठी अपेक्षा होती. मात्र, या स्पर्धेत तिला एकही वैयक्तिक किंवा सांघिक पदक मिळवता आले नाही, ज्यामुळे क्रीडाप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. मनूने २५ मीटर पिस्तूल आणि १० मीटर एअर पिस्तूलच्या वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात भाग घेतला होता. सोमवारी महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात भारतीय संघ पाचव्या स्थानावर राहिल्याने मनूचे आशियाई खेळांतील आव्हान संपुष्टात आले. ईशा सिंग, मनू भाकर आणि राही सरनोबत या तिघांच्या भारतीय संघाने १७२७-५६x गुणांसह पाचवे स्थान मिळवले. या प्रकारात चीनने सुवर्ण, दक्षिण कोरियाने रौप्य आणि चिनी तैपेईने कांस्य पदक पटकावले.

मनूचे वडील रामकिशन म्हणाले की, सुवर्णपदकाच्या शर्यतीत संघ मजबूत स्थितीत असताना राही सरनोबतच्या एका शॉटचे गुण न मोजल्याने भारताचे गणित बिघडले. "जर एखाद्या शॉटची गणनाच झाली नाही तर त्याचा स्कोअर शून्य धरला जातो. त्यामुळे स्पर्धेत आपण थेट १० गुणांनी मागे पडलो," असे सांगत त्यांनी या एका चुकीमुळे भारतीय संघाचे सुवर्णपदक हुकल्याची खंत व्यक्त केली. यानंतर खेळाडूंच्या सुविधांवर बोलताना त्यांनी तिथल्या बिकट परिस्थितीचा पाढाच वाचला. शूटिंग रेंजजवळ येणाऱ्या गटाराच्या दुर्गंधीचा उल्लेख करत त्यांनी नागोया शहरापासून शूटिंग रेंज अत्यंत दूर असल्याकडे लक्ष वेधले. "इथे गटाराची तीव्र दुर्गंधी येत आहे आणि अशा वातावरणात खेळाडूंना नेमबाजी करावी लागत आहे. शूटिंग रेंज शहरापासून इतकी लांब आहे की खेळाडूंचे रोज ४ ते ५ तास फक्त प्रवासात जात आहेत. त्यातच बसच्या वेळांचे नियोजनही चुकीचे आहे," असे ते म्हणाले. जपानच्या ढिसाळ कारभारावर टीका करताना ते पुढे म्हणाले, "अशा मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्याची तयारी नसेल, तर जपानने असे कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्यांनी आधी आपल्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याची गरज आहे." या कामगिरीबाबत सांगायचे तर, मनू भाकर महिलांच्या २५ मीटर पिस्तूल वैयक्तिक पात्रता फेरीत ५७९-१८x गुण मिळवून ११ व्या स्थानावर राहिली, ज्यामुळे तिचे अंतिम फेरीतील स्थान हुकले. तर याच प्रकारात राही सरनोबत ५६८-१६x गुणांसह ३० व्या स्थानावर राहिली.

याआधी मनू १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात १८१.१ गुणांसह पाचव्या स्थानावर राहिल्याने अंतिम फेरी गाठू शकली नव्हती. तर ईशा सिंग ५७२ गुणांसह १६ व्या आणि सुरुची सिंग ५६८ गुणांसह २६ व्या स्थानावर राहिल्या. १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारातही भारतीय संघ अवघ्या काही गुणांनी पदक गमावत चौथ्या स्थानावर राहिला. आशियाई खेळांपूर्वी मनू भाकर उत्कृष्ट फॉर्ममध्ये होती. तिने हॉंगझोऊ येथील 'आयएसएसएफ विश्वचषक २०२६' मध्ये कांस्य पदक जिंकले होते, जिथे ईशा सिंगने सुवर्णपदक पटकावले होते. याशिवाय म्युनिकमधील विश्वचषकात मनूने सम्राट राणासोबत १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकले होते, तर मायदेशात झालेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकारात वैयक्तिक रौप्य पदक आपल्या नावावर केले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >