Devendra Fadnavis : पदवीपुरते शिक्षण पुरेसे नाही, बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्यविकास आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोकण, नाशिक विभागातील महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ


मुंबई : देशातील युवा शक्तीला रोजगारक्षम बनविण्यासाठी शिक्षणासोबत कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि रोजगार यांची सांगड घालणे आवश्यक आहे. प्राप्त परिस्थितीत पदवी मिळवणे पुरेसे नसून एआय, सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग यांसारख्या बदलत्या तंत्रज्ञानानुसार तरुणांनी सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात करणे आणि ‘अपस्किलिंग’ करणे ही काळाची गरज आहे. जगातील २८ हून अधिक देशांमध्ये मनुष्यबळाची मोठी मागणी असून, महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.


श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्या’चा कोकण व नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांत ऑनलाइन शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.


या वेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पणन मंत्री जयकुमार रावल, महिला व बालविकास मंत्री, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. हेमलता बागला, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त डॉ. अमित सैनी, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, सृजन ट्रस्टचे अध्यक्ष दीपक मुकादम यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्यभरातून हजारो विद्यार्थी ऑनलाइन व प्रत्यक्ष उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सहीदा परमाणिक यांना क्रेवा कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, बेलापूर आणि कांती शंभू चव्हाण यांना क्रेवा कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, कुर्ला या कंपन्यांकडून नियुक्तीपत्र देण्यात आले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. कोकण आणि नाशिक विभागातील तरुणांना या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार आणि स्वरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला ‘अंत्योदय’ आणि ‘एकात्म मानव दर्शन’ हा विचार समाजातील शेवटच्या घटकाचा विकास साधणारा आहे. त्याच विचाराच्या आधारे शासनाचे कामकाज सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.


देशातील मानव संसाधनाची निर्मिती हा शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. त्याच्या आधारावर २०४७चा विकसित भारत उभारता येईल. गरीबीमुक्त, बेरोजगारीमुक्त आणि रोगमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या त्रिसूत्रीवर आधारित व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या लोकसंख्येपैकी सुमारे ६५ टक्के लोकसंख्या कार्यक्षम युवा शक्ती आहे. एका बाजूला उद्योजकांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे, तर दुसऱ्या बाजूला तरुणांना रोजगाराची गरज आहे. या दोघांना जोडणारा दुवा म्हणून रोजगार मेळावे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे फडणवीस म्हणाले. बदलत्या तंत्रज्ञानानुसार युवकांनी सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.



एक लाखांहून अधिक तरुणांची नोंदणी


कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, यावेळी केवळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांपुरते रोजगार मेळावे मर्यादित ठेवण्यात आलेले नाहीत. सर्व स्तरांतील तरुणांसाठी प्रत्येक तालुक्यात किमान तीन छोटे रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. रोजगार मेळावे घेण्याबरोबरच तरुणांना प्रत्यक्ष रोजगार मिळावा यासाठी सात दिवसांचे मोफत पूर्व-रोजगार प्रशिक्षण देण्यात आले. आतापर्यंत ६१ हजार मुला-मुलींनी हे प्रशिक्षण घेतले आहे. या रोजगार मेळाव्यासाठी एक लाखांपेक्षा अधिक तरुणांनी नोंदणी केली असून, किमान ७० टक्के तरुणांना रोजगार किंवा स्वरोजगाराशी जोडल्याशिवाय थांबणार नसल्याचे लोढा यांनी सांगितले.



१२ जिल्ह्यांत ४००हून अधिक मेळावे


- कोकण आणि नाशिक विभागातील १२ जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. आतापर्यंत १ हजार ५००हून अधिक उद्योजक आणि नियोक्ते तसेच एक लाखांहून अधिक रोजगार इच्छुक युवक-युवतींनी रोजगार महाकुंभासाठी नोंदणी केली आहे. सहभागी उद्योजकांकडून २५ हजारांहून अधिक रोजगाराच्या रिक्त पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे.


- जिल्हानिहाय शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्थानिक प्रशासन आणि इतर संस्थांच्या समन्वयातून उमेदवार व नियोक्त्यांचा समन्वय करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, कामगार विभाग, उद्योग विभाग, पणन विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, विद्यापीठे आणि औद्योगिक संघटनांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar News: जिल्हा बँकेच्या जेवणाच्या पंगतीवर FDAचा छापा, केटररकडे परवानाच नाही

अहिल्यानगर (प्रतिनिधी): जिल्हा बँकेच्या सोमवारी झालेल्या सभेनंतर केशर गुलाब मंगल कार्यालयात झालेल्या

Pune Teacher Elections: पुणे शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि उदय सामंतांचे 'ओएसडी' आमनेसामने, कोणाला संधी मिळणार?

पुणे: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारीवरून शिवसेनेतच रस्सीखेच सुरू झाली आहे.

Devendra Fadanvis : ‘ट्रिगर’मध्ये न बसलेल्या तालुक्यांतही पीक नुकसानीनुसार मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

‘ग्राउंड ट्रूथिंग’द्वारे प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करणार मुंबई : दुष्काळाच्या मदतीसाठी ‘ट्रिगर-१’च्या निकषात

Sarathi Sanstha: ‘सारथी’ला 122 कोटी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटी

मुंबई: मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा आणि वसतिगृहांची उभारणी करण्यासाठी छत्रपती शाहू

S. Chockalingam : 'एसआयआर' प्रक्रियेत स्थानिक अधिकाऱ्यांचे अधिकार पूर्ववत करा

- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांचे केंद्रीय आयोगाला पत्र मुंबई : मतदार यादीच्या विशेष सखोल

Matang Samaj : अनुसूचित जाती उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक

- सीएसएमटी परिसरात आंदोलन; हलगी घेऊन बांधव उतरले रस्त्यावर, बीएमसी आणि मंत्रालयाकडे जाणारे रस्ते बंद मुंबई :